भारताच्या शेजारी राष्ट्रांना मदत करुन भारताची कोंडी करण्यासाठी चीनने नवी खेळी खेळली आहे. व्यापारासाठी भारताच्या बंदरांवर अवलंबून असलेल्या नेपाळला चीनने त्यांच्या देशातील बंदरांचा वापर करु देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नेपाळला व्यापारासाठी भारताची आवश्यकता भासणार नाही.

नेपाळ आणि चीन सरकारमध्ये गुरुवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत व्यापारविषयक धोरणावर चर्चा झाली. यात नेपाळला चीनमधील चार बंदरं खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे किंवा रस्तेमार्गाने व्यापाऱ्यांना त्यांचा माल बंदरापर्यंत नेता येईल किंवा बंदरावरुन आणता येणार आहे.  मात्र, चीनच्या बंदरांवरुन व्यापार करणे हे व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. नेपाळपासून चीनमधील सर्वात जवळचे बंदर हे दोन हजार ६०० किलोमीटरवर आहे. नेपाळमधील रस्त्यांची दुरावस्था ही देखील प्रमुख समस्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

इंधनाच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी तसेच आवश्यक वस्तूंसाठी नेपाळ अजूनही भारतावर अवलंबून आहे. दुसऱ्या देशांशी व्यापार करण्यासाठी नेपाळ भारतीय बंदरांचा वापर करतो. मात्र, चीनने नेपाळला मैत्रीचा हात पुढे करत नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. नेपाळला भारतापासून दूर करण्यासाठी चीनने ही खेळी खेळल्याचे सांगितले.

चीनने नेपाळला शेनजेन, लियानयुगांग, झाजियांग आणि तियानजिन ही बंदरं खुली केली आहेत. यासाठी चीन नेपाळला पर्यायी मार्ग खुला करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते. तिबेटमार्गे ट्रक आणि कंटेनरला जाता येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.