China’s First statement on escalating Iran-US war : गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल-अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केले असून तिन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान, या सर्व कोलाहलात आता चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण प्रदेशात हा संघर्ष आणखी पसरू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन चीनने केले आहे. हिंदूस्थान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

संघर्ष रोखा

लढाईचा प्रसार रोखा, अशा स्पष्ट शब्दांत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. “सर्वात तातडीचे काम म्हणजे लष्करी कारवाया थांबवणे आणि संघर्षाचा प्रसार रोखणे,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसंच, “संवाद आणि वाटाघाटीद्वारे तोडगा काढावा” असं आवाहन केलं असल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे.

खामेनी यांच्या निधनानंतर संघर्ष पेटला

इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाईला सुरूवात केल्यानंतर मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायल-अमेरिकेने केलल्या या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे निधन झाल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

इराणने त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. इराणने बहरीन व कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले. दरम्यान, लेबनॉनमधील कट्टरपंथी इस्लामिक राजकीय संघटना हिजबुल्लाने, खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ले सुरू केले आहेत. यामुळे संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या विरोधात मोहिम सुरू केली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे. “पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. भारत संवादाच्या माध्यमातून सर्व संघर्ष सोडवले जावेत याचे समर्थन करतो. या भागात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व देशांबरोबर मिळून काम करत राहू”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

आम्ही सदैव शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आणि जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांततेचा आवाज आणखी सशक्त होतो, असेही पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, दहशतवाद आणि कट्टरतावाद यांचा प्रभाव या विषयावर कॅनडा आणि भारत यांची एकच भूमिका आहे. ही संपूर्ण जगासमोर असलेली मोठी आव्हाने आहेत, असेही मोदींनी स्पष्ट केले.