चीनने लडाखच्या डेमचोक भागात घुसखोरी करून दहा दिवसांनंतरही परिस्थिती जैसे थे आहे. भारताने कालव्याचे काम सुरू केल्याने त्याच्या निषेधार्थ हे तंबू ठोकल्याचा कांगावा चीनने सुरू ठेवला आहे. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग हे बुधवारी भारतभेटीवर येत आहेत. त्यापूर्वी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप लडाखचे भाजप खासदार थुपस्तान चेवंग यांनी केला आहे. भारताच्या हद्दीत हे काम सुरू असतानाही हे काम थांबवेपर्यंत मागे जाणार नाही, अशी हटवादी भूमिका चीनने घेतली आहे. विशेष म्हणजे चिनी सैन्याने नागरिकांना पुढे केले आहे. चीनने ५ व ६ सप्टेंबरला ५०० मीटर भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. भारतीय हद्दीतून नागरिक पुढे सरसावत चीनला काम थांबवण्यास भाग पडले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. कैलाश-मानससरोवरला जाण्याचा हा मार्ग असून, तो यात्रेकरूंसाठी खुला करावा अशी मागणी भारताकडून चीनकडे केली जात आहे.