पाकिस्तान आणि चीन यांच्यातील ‘कधीही न तुटणाऱ्या’ मैत्रीला मोठा तडा गेल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने भारताला टक्कर देण्यासाठी चीनकडे समुद्रातून अण्वस्त्र हल्ला करण्याची अत्यंत संवेदनशील ‘सेकंड-स्ट्राईक’सिस्टीम मागितली होती. मात्र, चीनने पाकिस्तानची ही मागणी अत्यंत ‘अवाजवी’ असल्याचे सांगत ती थेट फेटाळून लावली आहे. ‘ड्रॉप साइट न्यूज’ने लीक केलेल्या काही गुप्त राजनैतिक दस्तऐवजांमधून हा खळबळजनक खुलासा झाला आहे.
काय आहे ‘सेकंड-स्ट्राईक’ क्षमता?
‘सेकंड-स्ट्राईक’ क्षमता म्हणजे जर एखाद्या शत्रू देशाने अचानक अण्वस्त्र हल्ला करून पाकिस्तानचे जमिनीवरील सर्व तळ उद्ध्वस्त केले, तरीही समुद्रात लपलेल्या पाणबुडीद्वारे पाकिस्तान समोरच्या देशावर पलटवार (अण्वस्त्र हल्ला) करू शकेल. ही क्षमता प्रामुख्याने ‘न्यूक्लियर पॉवर्ड बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन’ (SSBN) म्हणजेच अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांवर अवलंबून असते, ज्या समुद्राच्या खोल पाण्यात महिनान्महिने लपून राहू शकतात.
चीनने का दिला नकार?
लीक झालेल्या कागदपत्रांनुसार, २०२४ मध्ये पाकिस्तानने या तंत्रज्ञानासाठी चीनकडे हात पसरले होते. मात्र, चीनने स्पष्ट केले की, अशी संवेदनशील अण्वस्त्र प्रणाली पाकिस्तानला देणे म्हणजे दक्षिण आशियातील अण्वस्त्र प्रसारात चीनचा थेट सहभाग मानला जाईल. यामुळे जागतिक स्तरावर चीनची मोठी नाचक्की होऊ शकते, ही भीती असल्याने बीजिंगने इस्लामाबादला रिकाम्या हाताने परत पाठवले, असे वृत्त ‘न्यूज१८’ ने प्रसिध्द केले आहे.
‘ग्वादर बंदर’ आणि पाकिस्तानच्या अटी
गेल्या दशकाहून अधिक काळ पाकिस्तानने चीनला आपले ‘ग्वादर बंदर’ कायमस्वरूपी लष्करी तळ बनवण्यास विरोध केला होता. मात्र, आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानने अखेर यासाठी होकार दिला. पण, त्याबदल्यात पाकिस्तानने चीनसमोर कडक अटी ठेवल्या होत्या, त्यामध्ये या करारामुळे अमेरिकेने आर्थिक किंवा राजनैतिक निर्बंध लादल्यास चीनने पाकिस्तानचे रक्षण करावे. आणि भारताशी स्पर्धा करण्यासाठी चीनने पाकिस्तानच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांचे आधुनिकीकरण करावे. अशा अटी होत्या.
भारताची स्थिती काय?
सध्या जगातील मोजक्याच ६ देशांकडे (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि भारत) ही समुद्रातील ‘सेकंड-स्ट्राईक’ क्षमता आहे. भारताने आपल्या स्वदेशी ‘आयएनएस अरिहंत’ (Arihant-class) या अणुपाणबुडी कार्यक्रमाद्वारे ही क्षमता आधीच यशस्वीपणे साध्य केली आहे. दुसरीकडे, इस्रायलकडेही परंपरागत डॉल्फिन-क्लास पाणबुड्यांद्वारे अशी प्रादेशिक क्षमता असल्याचे मानले जाते.
भारताच्या वाढत्या सागरी शक्तीला शह देण्यासाठी पाकिस्तान समुद्रामध्ये आपले अण्वस्त्र जाळे मजबूत करू पाहत होता. मात्र, सर्वात विश्वासू मित्र असलेल्या चीननेच ऐनवेळी पाठ फिरवल्याने पाकिस्तानच्या संरक्षण रणनीतीला आणि अण्वस्त्र सज्जतेला मोठा धक्का बसला आहे.
