Richard Verma : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमुळे चीन आणि रशिया चिंतेत आहेत, असं विधान अमेरिकेच्या अधिकाऱ्याने केलं आहे. तसेच दोन्ही देशातील संबंध विरोधकांच्या कार्यपद्धतीपेक्षा खूप वेगळे असून या वेगळेपणामुळेच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या संबंधांना शतकातील ऐतिहासिक संबंध म्हटले होते, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले रिचर्ड वर्मा?
अमेरिकेच्या राज्य व्यवस्थापन आणि संसाधनांचे उपसचिव रिचर्ड वर्मा यांनी प्रतिष्ठित हडसन संस्थेतील एका कार्यक्रमात बोलताना भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं आहे. “भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधामुळे चीन आणि रशिया चिंतेत आहेत. पण दोन्ही देशाच्या संबंधांमुळे त्यांची चिंता का वाढली आहे? खरं सांगायचं तर त्याचं कारण सुरक्षा क्षेत्रातील आदान-प्रदान किंवा वाढता व्यापार नाही, तर दोन्ही देश जगासमोर सर्वसमावेशकता, शांतता, विवादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याचे समर्थन करतात. त्यामुळेच चीन आणि रशियाची चिंता वाढली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
२० वर्षांपूर्वीच्या विधानाची करून दिली आठवण
“भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध काही विरोधकांच्या कार्यपद्धतीपेक्षा खूप वेगळे आहेत. या वेगळेपणामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन्ही देशांमधील संबंधांना या शतकातील ऐतिहासिक संबंध म्हटले होते”, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी २० वर्षांपूर्वीच्या एका विधानाचीही आठवण करून दिली. ते म्हणाले, “२० वर्षांपूर्वी मी तत्कालीन सिनेटर जो बायडेन आणि स्टाफ डायरेक्टर टोनी ब्लिंकन यांच्याबरोबर चर्चा करत होतो. त्यावेळी जो बायडेन यांनी म्हटलं होतं की जर २०२० पर्यंत भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश जवळचे मित्र झाले, तर जग अधिक सुरक्षित होईल.”
क्वाडबाबत बोलताना म्हणाले…
पुढे बोलताना त्यांनी क्वाडबाबतही प्रतिक्रिया दिली. यावेळी रिचर्ड वर्मा यांना क्वाडच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना, “प्रदेशातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्याला प्रोत्साहन देणं हे क्वाडचं मुख्य उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाबरोबरच इतर क्षेत्रातील विविध मुद्द्यावरून क्वाड संघटनेनं आजपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत”, असे ते म्हणाले.