US-Iran War Update : अमेरिका-इराणमधील युद्ध अखेर ८ एप्रिल रोजी थांबलं असून आता या युद्धाच्या शांतता कराराबाबत पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा पार पडत आहेत. या महत्वाच्या बैठकीसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स आणि इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये दाखल झालं आहे. त्यामुळे आता अमेरिका-इराणमध्ये काय करार होणार? कोणत्या अटी असणार? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
या घडामोडी सुरू असतानाच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. इराणला येत्या काही आठवड्यांत चीनकडून नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केला असल्याचं वृत्त सीएनएनने दिलं आहे. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हा दावा चीनने फेटाळून लावला आहे.
अमेरिकेतील चिनी दूतावासाने म्हटलं की, “चीनने संघर्षातील कोणत्याही पक्षाला कधीही शस्त्रे पुरवलेली नाहीत. आम्ही अमेरिकेला आवाहन करतो की त्यांनी निराधार आरोप करणं, द्वेषपूर्ण संबंध जोडणं आणि सनसनाटी निर्माण करणं टाळावं. आम्हाला आशा आहे की संबंधित पक्ष तणाव कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करतील.”
चीन इराणला खरंच शस्त्र पाठवेल का?
अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या दाव्यानुसार, चीन इराणला विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली जी मॅनपॅड्स (MANPADs) म्हणूनही ओळखली जाते, ही क्षेपणास्त्र प्रणाली पाठवण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणची बरीचशी हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट झाली. त्यामुळे या हालचाली सुरू असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. मात्र, याबाबत इराणने कोणताही तपशील किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.
इस्लामाबादमधील बैठकीत काय ठरणार?
पाकिस्तानने मध्यस्थी केल्यानंतर अमेरिका व इराणने शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनमधील इराणचे समर्थन असलेल्या हेजबोल्ला संघटनेवर हल्ला केला. तसेच लेबनॉनची राजधानी बैरूतवर देखील बॉम्बवर्षाव केला. त्यात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे अमेरिका व इराणमधील शस्त्रसंधी करार धोक्यात आला होता. इस्रायल व लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करण्याची मागणी इराणने अमेरिकेकडे केली. अमेरिकेने इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी संपर्क साधून त्यांना लेबनॉनबरोबर वाटाघाटी करण्यास तयार केले. तसेच लेबनॉनबरोबर संघर्ष आणखी न वाढवण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर इराण व अमेरिकेची इस्लामाबादेत बैठक होते की नाही? याबाबत काल साशंकता होती. अखेर ही बैठक आज (११ एप्रिल) इस्लामाबादमध्ये होत असून अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.
