अफगाणिस्तान सध्या पूर्णपणे तालिबानच्या तब्येत आहे. त्यांची सरकार स्थापनेची तयारी देखील सुरू झाली आहे. या ठिकाणी सध्या अत्यंत आव्हानात्मक स्थिती आहे. परंतु, चीन आता या परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी चीनबाबत मोठा दावा केला आहे. हॅले यांनी सांगितलं आहे की, एकेकाळी अमेरिकेच्या ताब्यात असलेला या देशातील बाग्राम एअर बेस ((Bagram Air Base Afghanistan) चीन आपल्या ताब्यात घेऊ शकतो. मुख्य म्हणजे हा एअरबेस रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निक्की हॅले बुधवारी (१ सप्टेंबर) म्हणाल्या कि, “आपल्याला चीनवर नजर ठेवण्याची गरज आहे. कारण मला असं वाटतं की, चीन बाग्राम एअरबेसच्या दिशेने आपली पावलं टाकत असल्याचं आपल्याला लवकरच दिसून येईल. मला असंही वाटतं की ते (चीन) अफगाणिस्तानात ही पावलं उचलत आहेत आणि भारताविरुद्ध बळकट होण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत आहेत.”

सायबर गुन्ह्यांविरुद्ध अमेरिका सज्ज

हॅले यांनी पुढे तालिबानच्या आव्हानांना अमेरिका कशी समोर जाईल यावरही भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, “अमेरिकेने सायबर क्राईमच्या विरोधात सज्ज व्हायला हवं आणि मित्र देशांशी असलेलं संबंध आणखी दृढ करायला हवेत.” यावेळी निक्की हॅले यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकेला बाहेर काढल्याबद्दल जो बायडेन यांच्यावर टीका केली आहे. हॅले म्हणाल्या कि, “ही अशी वेळ आहे कि जेव्हा अमेरिकेने भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या आपल्या सहयोगी देशांशी असलेले संपर्क दृढ करायला हवे. बायडेन सरकारने त्यांना (सहयोगी देशांना) आश्वासन दिलं पाहिजे की, अमेरिका त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे.”

रशिया आणि चीन परिस्थितीचा फायदा उचलण्यास तयार

हॅले यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पुढे म्हटलं आहे की, “आपली सायबर सुरक्षा मजबूत राहील याची खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी, ते म्हणाले की, रशिया आणि चीन अफगाणिस्तानमधील जो बायडेन यांच्या माघारीचा पूर्ण आनंद घेत आहेत. इतकंच नव्हे तर ते या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्यास देखील तयार आहेत.”