पीटीआय, बीजिंग
बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या वक्तव्याला चीनने आक्षेप घेतला आहे. तिबेटसंबंधी मुद्द्यांमध्ये भारताने हस्तक्षेप करू नये. यासंदर्भात मतप्रदर्शन करताना भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. द्विपक्षीय संबंधांमध्ये परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे चीनकडून शुक्रवारी सांगण्यात आले.
दलाई लामा लवकरच वयाची नव्वदी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरू आहे. दलाई लामा यांना त्यांच्या इच्छेनुसार उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य रिजिजू यांनी केले होते.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी रिजिजू यांच्या विधानावर आक्षेप घेतला. भारताने १४ व्या दलाई लामा यांच्या चीनविरोधी फुटीरतावादी स्वभावापासून दूर राहावे आणि तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर वचनबद्धतेचे पालन करावे, असे ते म्हणाले.
दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त मॅकलिओडगंज सज्ज
धर्मशाळा : दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात येत असून त्यासाठी हिमालयाच्या कुशीतील मॅकलिओडगंज शहर सज्ज झाले आहे. हिमाचल प्रदेशातील या शहरात निर्वासित तिबेटी नागरिकांची मोठी वस्ती आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.