पीटीआय, नवी दिल्ली
चीनने भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानचा वापर केला. मे महिन्यात भारत-पाकिस्तानी सैन्यात झालेल्या संघर्षादरम्यान आपल्या सर्वकालीन मित्राला तो मदत करीत होता, असा गौप्यस्फोट सैन्यदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी शुक्रवारी केला. उद्याोगांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘फिक्की’च्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. चीनने विविध शस्त्रप्रणालींची चाचणी घेण्यासाठी भारत-पाकिस्तान संघर्षाचा ‘जिवंत प्रयोगशाळा’ म्हणून वापर केला असल्याचेही ते म्हणाले.

‘३६ चाली’ आणि शत्रूकडून ‘उधार घेतलेल्या चाकू’ने मारण्याच्या चीनच्या प्राचीन लष्करी रणनीतीचा संदर्भ देत, चीनने भारताचे नुकसान करण्यासाठी पाकिस्तानला सर्वतोपरी मदत केली, असा दावाही सिंह यांनी केला. (‘उधार घेतलेल्या चाकूने मारणे’ म्हणजे शत्रूला पराभूत करण्यासाठी तिसऱ्या पक्षाचा वापर करणे, म्हणजेच चीनने भारताविरुद्ध पाकिस्तानचा वापर केला.)

पाकिस्तान आणि चीनव्यतिरिक्त तुर्कीही पाकिस्तानला लष्करी उपकरणे पुरवण्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या ८१ टक्के लष्करी उपकरणांचा चीनकडून वापर होत असल्याने चीनने पाकिस्तानला दिलेला पाठिंबा आश्चर्यकारक नाही, असे भारतीय सैन्याच्या क्षमता, विकास आणि देखभालीची व्यवस्था पाहणारे लष्कराचे उपप्रमुख म्हणाले.

तुर्कीचीही पाकिस्तानला मदत

● तुर्कीनेसुद्धा पाकिस्तानला मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आम्ही युद्धादरम्यान आणि युद्धक्षेत्रात बरेच ड्रोन येताना आणि उतरताना पाहिले, तसेच तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या हालचालीही बघितल्या, असे सिंह यांनी सांगितले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लक्ष्यांचे नियोजन आणि निवड ही बऱ्याच माहितीवर आधारित होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

● पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या हल्ल्यांमुळे चार दिवस झालेल्या भीषण चकमकी १० मे रोजी शस्त्रविरामासह स्थगित झाल्या. भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानला त्या दिवशी शत्रुत्व संपवण्याची विनंती करावी लागली, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते (चीन) उत्तरेकडील सीमेवर थेट संघर्षात उतरण्यापेक्षा भारताचे नुकसान करण्यासाठी शेजारी देशाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. भारताविरुद्ध पाकिस्तान फक्त आघाडीवर होता. खरा पाठिंबा तर चीनकडून होता. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, पाकिस्तानला मिळत असलेल्या ८१ टक्के लष्करी उपकरणांचा पुरवठा चीनकडून होत असल्याने आम्हाला आश्चर्य वाटले नाही. – लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह, उपप्रमुख