नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भीषण महापूर आल्याची घटना घडली. या महापुरात ५०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. त्यामुळे सध्या नेपाळवर मोठं नैसर्गिक संकट कोसळलेलं आहे. या महापुरानंतर अनेक गाव भुईसपाट झाले आहेत. नेपाळमधील या महापुराच्या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर येत आहेत. या महापुरामुळे नेपाळमध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी देखील झालेली आहे.

सध्या नेपाळच्या सैन्यांकडून आणि पोलिसांकडून व बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. मदत व बचावकार्याच्या मदतीसाठी भारत, चीननेही पुढाकार घेतला आहे. दरम्यान, नेपाळवर आलेली ही आपत्ती अद्याप पूर्णपणे टळलेली नाही. कारण आता चीनने पुन्हा एकदा नेपाळची चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेपाळ आणि तिबेटच्या काही भागांत आलेल्या विनाशकारी पुरामुळे तयार झालेला एक तलाव कधीही फुटू शकतो, असा इशारा चीनने नेपाळला दिला आहे. या तलावाच्या पाण्याचा रंग बदलत असून हे वाढत्या धोक्याचं लक्षण असण्याची शक्यता असल्याचं चीनने म्हटलं आहे. जरी हा तलाव फुटला तरी नदीतील पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त ५०० घनमीटर प्रति सेकंद इतका असेल, असंही चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

चीनने नेपाळला काय इशारा दिला?

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या संदेशात चिनी अधिकाऱ्यांनी म्हटलं की, या तलावाच्या पाण्याचा रंग सतत बदलत आहे. त्यामुळे हे तलाव फुटण्याचं लक्षण असू शकतं. या तलावाचा रंग सतत गडद होत आहे. याचा अर्थ असा की तो फुटू शकतो. पाण्याचा साठा फार मोठा नसल्यामुळे नदीच्या खालच्या प्रवाहातील भागात पाण्याचा प्रवाह थोडा वाढू शकतो. मात्र, त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. चिनी अधिकाऱ्यांनी नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, हे सरोवर चीनच्या बाजूकडील ‘छोछेन’ नदी आणि नेपाळच्या बाजूकडील ‘पुरेपु’ नदी यांच्या संगमाजवळ तयार झालेलं आहे. चीनच्या जलसंपदा मंत्रालयाच्या माहितीनुसार, या सरोवरातील पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे, शुक्रवारपर्यंत या सरोवरात २५ लाख (२.५ दशलक्ष) घनमीटर पाणी जमा झालं होतं. हे सरोवर फुटल्यास होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानीचा अंदाज चीनकडून घेतला जात आहे.

चीनच्या म्हणण्यांनुसार, जर अशी परिस्थिती उद्भवल्यास नदीपात्रात येणारा पाण्याचा कमाल प्रवाह प्रति सेकंद ५०० घनमीटर इतका असू शकतो. समजा या सरोवराच्या बांधाचा काही भाग फुटला तर पाण्याचा कमाल प्रवाह प्रति सेकंद ५०० घनमीटर असू शकतो. पण हा प्रवाह नदीच्या पात्रापुरताच मर्यादित राहील.