China Warning to US Hormuz Blockade: अमेरिकेने इराणला कोंडीत पकडण्यासाठी जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नाकेबंदीमुळे जागतिक तेल, गॅस व्यापाराला मोठा फटका बसणार आहे. चीनने मात्र अमेरिकेच्या नाकेबंदीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “चीन आणि इराणमध्ये व्यापारी करार आहेत. कोणीही चीनच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करु नये”, असा इशाराच चीनने अमेरिकेला आहे.

चीनचा अमेरिकेला इशारा

आज रात्री साडे सात वाजता मुदत समाप्तीनंतर अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर काही वेळातच चीनकडून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे. चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी नाकेबंदीविरोधात अमेरिकेला इशारा दिला आहे. “आमचे इराणबरोबर व्यापार आणि उर्जासंबधित करार आहेत. आमच्या या संबंधात इतर कोणीही हस्तक्षेप करु नये”, असा स्पष्ट इशारा डोंग जून यांनी दिला आहे.

चीनसाठी समुद्रमार्ग अत्यंत महत्वाचा

चीनसाठी समुद्रमार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो. यामार्गातून इराणला जवळपास ४० टक्के इंधन पुरवठा आणि ३० टक्के एलएनजी पुरवठा केला जातो. यामुळेच चीन अमेरिका – इस्रायलविरुद्ध इराण युद्धात युद्धविरामाची मागणी करत होते. यामागे समुद्रमार्ग सुरक्षित ठेवणे हा त्यांचा उद्देश होता. आंतरराष्ट्रीय समुदायासाठी समुद्रमार्ग सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मांडले होते. इराणमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे समुद्रमार्गात अडथळा निर्माण झाल्याचे चीन ओळखून होता त्यामुळे युद्धविरामासाठी त्यांच्याकडून हालचाली सुरु होत्या.

युद्धविरामासाठी चीनचे प्रयत्न

अमेरिका – इस्रायल यांचा इराणविरुद्ध सुरु असलेला संघर्ष समाप्त करण्यासाठी चीनकडून नेहमीच सकारात्मक भूमिका घेण्यात आली. युद्धविरामासाठी त्यांच्याकडून हालचाली सुरु होत्या. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी करण्याचे जाहीर केले. सामुद्रधुनीत प्रवेश करणारे आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखले जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यासाठी आज रात्री ७.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

अमेरिकेकडून नाकेबंदी

दरम्यान, मुदत समाप्त होताच अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. इराणची सर्व नौदल जवळपास समाप्त झाले आहे. पण, काही कमी धोक्याची जहाजं शिल्लक आहेत, या जहाजांनी नाकेबंदीच्या जवळपास येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना नष्ट केले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी ठरल्याप्रमाणे नाकेबंदी केली असून, आता चीन काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.