Donald Trump on Canada: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कॅनडावर जोरदार टीका केली. ग्रीनलँडवरील महत्त्वाकांक्षी अशा ‘गोल्डन डोम’ या क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पाला विरोध करून कॅनडाने उत्तर अमेरिकेच्या सुरक्षेला हानी पोहोचवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. तसेच कॅनडाने चीनशी आर्थिक संबंध प्रस्थापित केले असून चीन त्यांना सुरुवातीच्या काही वर्षांतच खाऊन टाकेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून कॅनडाचा निषेध केला. ते म्हणाले, ग्रीनलँडवर उभारण्यात येणाऱ्या गोल्डन डोमला कॅनडाचा विरोध आहे. हे कवच कॅनडाचे संरक्षण करणार असले तरी त्यांचा याला विरोध आहे. कॅनडाने चीनबरोबर व्यवसाय करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. जे त्यांना पहिल्या काही वर्षातच खाऊन टाकतील.

गोल्डन डोम काय आहे?

इस्रायलकडे असलेल्या आर्यन डोम यंत्रणेप्रमाणे अमेरिकेने देशाच्या सुरक्षेसाठी ‘गोल्डन डोम’ ही यंत्रणा उभारली असल्याचे ट्रम्प यांनी मागच्या काळात जाहीर केले होते. सध्या त्यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचा दावा सांगितला आहे. या प्रदेशात गोल्डन डोम उभारून संभाव्य बॅलिस्टिक, हायपरसोनिक आणि इतर क्षेपणास्त्र धोक्यांना रोखण्यासाठी त्यांना गोल्डन डोम उभारायचा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रुथवरील ताजे विधान आणि अलीकडेच दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत त्यांनी केलेले भाषण हे चीनशी वाढती धोरणात्मक स्पर्धा आणि राजनैतिक तणावाचे संकेत आहेत.

donald trump truth post on candada
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अलीकडेच चीनचा दौरा केला. ज्यात त्यांनी व्यापारी करार, कॅनेडियन कृषी उत्पादनांवरील कर कपात आणि चिनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी कोटा अशा स्वरुपाचे करार केले होते.

तसेच मार्क कार्नी यांनी दावोसमध्ये केलेले भाषणही ट्रम्प यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. कार्नी यांच्या भाषणानंतर ट्रम्प यांनी कॅनडावर टीका केली आहे. अमेरिकेचे वर्चस्व झुगारून एक नवी जागतिक व्यवस्था उभी राहत असल्याचे कार्नी भाषणात म्हणाले होते.