आग्नेय आशियात वर्चस्वाचा चीनचा हेतू नाही- जिनपिंग

आग्नेय आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल जगभरात चिंतेचा सूर व्यक्त होतो.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग

बिजिंग : आग्नेय आशिय़ात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा चीनचा कोणताही हेतू नाही, असे प्रतिपादन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्या विशेष बैठकीत केले. आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्यातील संबंधांना ३० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली आहे. ती आभासी पद्धतीने सुरू आहे.

दक्षिण चिनी समुद्रात सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग म्हणाले की, आमच्या छोटय़ा शेजारी देशांना त्रास देण्याचाही आमचा हेतू नाही. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अर्थात आसियान राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांनी हा निर्वाळा दिला. राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला म्यानमारचा प्रतिनिधी उपस्थित नाही. त्या देशातील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना भेटण्याची परवानगी आसियानच्या दूताला नाकारण्यात आली होती. त्यामुळे तेथील लष्करशहा जनरल मिंग आंग लेंग यांना या परिषदेत सहभागी करून घेण्यास नकार देण्यात आला आहे. आग्नेय आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल जगभरात चिंतेचा सूर व्यक्त होतो.  या आरोपाचे चीनने नेहमी खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनने दावा सांगितला असून तो मलेशिया, व्हिएतनाम, ब्रूनेई आणि फिलिपाईन्स यांसारख्या आसियान देशांना मान्य नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: China will not seek dominance over southeast asia say xi jinping zws