भारताची विविध मार्गानी खोड काढणाऱ्या चीन आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी सहकार्य भारताची चिंता वाढवणारे आहे. नुकतीच भारतीय हद्दीत घुसखोरी करून तणाव निर्माण करणाऱ्या चीनकडून पाकिस्तानने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केल्याची माहिती पेंटागॉनने आपल्या वार्षिक अहवालात उघड केली आहे.
शस्त्रे निर्मितीच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारणाऱ्या चीनने सन २००७ ते २०११ या पाच वर्षांत तब्बल ११ अब्ज डॉलर किमतीची पारंपरिक शस्त्रे जगभरातील देशांना विकली आहेत. पेंटागॉनने आपल्या वार्षिक अहवालात चीनच्या या शस्त्रास्त्र विक्रीबद्दल सविस्तर माहिती नमूद केली आहे.
चीनने पारंपरिक शस्त्रनिर्मितीत जोरदार मुसंडी मारली आहे. आंतरराष्ट्रीय शस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपेक्षा कमी किमतीत चीनची शस्त्रे उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक आशियाई, आफ्रिकी आणि मध्य आशियातील विकसनशील राष्ट्रे चिनी शस्त्रांना पसती देत असल्याचे पेंटगॉनने म्हटले आहे.
२०१२ आणि येणाऱ्या काळात चीनचा शस्त्रनिर्मिती उद्योग झपाटय़ाने विकसित होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच जगभरात आपल्या शस्त्रांसाठी खरेदीदार मिळवण्यासाठी चीन प्रयत्न करीत असल्याचेही पेंटगॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे.
चीनचे पाकिस्तानसोबतचे संबंध पूर्वापार चालत आले आहेत. या दोन्ही देशांच्या संबंधांवर तसेच शस्त्रास्त्रांच्या व्यवहारावर अमेरिका सातत्याने बारिक लक्ष ठेवून असल्याची माहिती अमेरिकेचे पूर्व आशिया संरक्षक विभागाचे उपसहसचिव डेव्हिड हेलवे यांनी पेंटगॉन येथील पत्रकार परिषदेत दिली.

चीनच्या मदतीने पाकिस्तानी शस्त्रनिर्मिती
* जेएफ -१७ लढाऊ विमाने
* एफ -२२ पी लढाऊ जहाज हेलिकॉप्टरसह
* के-८ जेट ट्रेनर
* एफ-७ लढाऊ विमाने
* हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे
* रणगाडे
* जहाजविरोधी क्षेपणास्त्र

चिनी शस्त्रास्त्रांचे खरेदीदार देश
पाकिस्तान
मध्य आशियाई देश
उत्तर आफ्रिकी देश