चीनमध्ये करोना विषाणूने शुक्रवारी १३ बळी घेतले असून एकूण मृतांची संख्या आता ३१८९ झाली आहे. निश्चित रुग्णांची संख्या ८०,८२४ असून आणखी ११ रुग्ण सापडले आहेत. चीनमधील रुग्ण कमी होत असले तरी बाहेरच्या देशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या आता वाढत आहे. परदेशातून आलेले सात रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण परदेशी रुग्णांची संख्या ९५ झाल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. नवीन १३ मृत्यू हे हुबेई प्रांतातील आहेत. चीनमध्ये एकूण निश्चित रुग्णांची संख्या आता ८०८२४ झाली आहे. त्यात मृत्यू पावलेल्या ३१८९ जणांचा समावेश आहे.  १२०९४ रुग्णांवर उपचार सुरू असून ६५५४१ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान चीनच्या शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सीओव्हीआयडी १९ विषाणूची साथ ओसरत असली तरी शाळा लगेच सुरू केल्या जाणार नाहीत. स्थानिक अधिकारी विषाणू पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे जाहीर करीत नाहीत तोपर्यंत हा निर्णय घेतला जाणार नाही. साथ रोग नियंत्रण विभागाचे संचालक वँग देंगफेंग यांनी सांगितले की, शाळा सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, मुले व शिक्षक या दोन्हींच्या सुरक्षेचा विचार केला जाईल.