बांगलादेशला चीनची भरघोस व्यापार सूट

एकूण ८२५६ बांगलादेशी उत्पादने करसवलत मिळणाऱ्या ९७ टक्क्यांच्या श्रेणीत येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

बांगलादेशला चुचकारण्याच्या प्रयत्नात, ९७ टक्के बांगलादेशी उत्पादनांना करामध्ये सूट देण्याची घोषणा करून चीनने त्या देशाच्या व्यापाराला फार मोठय़ा प्रमाणावर उत्तेजन दिले आहे. ही सवलत १ जुलैपासून लागू होणार आहे.

कोविड-१९ महासाथीच्या काळात द्विपक्षीय संबंधांत श्रेणीसुधार करण्याबाबत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा झाल्यानंतर महिनाभरानंतर चीनने हा निर्णय जाहीर केला आहे.

आपल्या ९७ टक्के उत्पादनांना चीनकडून करांमध्ये सूट दिली जाणार असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले.

सरकारच्या आर्थिक कूटनीतीचा भाग आणि बांगलादेश व चीन यांच्यातील पत्रव्यवहाराचा परिणाम म्हणून, बांगलादेशच्या ९७ टक्के करयोग्य वस्तूंवर शून्य करआकारणी करण्याबाबतची सूचना चिनी स्टेट कौन्सिलच्या कर आयोगाने नुकतीच जारी केली, असे वृत्त ‘दि ढाका ट्रिब्यून’ने मंत्रालयाच्या वक्तव्याच्या हवाल्याने दिले.

या घोषणेमुळे, एकूण ८२५६ बांगलादेशी उत्पादने करसवलत मिळणाऱ्या ९७ टक्क्यांच्या श्रेणीत येणार आहेत.

सध्या आशिया-पॅसिफिक व्यापार करारान्वये बांगलादेशच्या ३०९५ उत्पादनांना चिनी बाजारपेठांमध्ये करमुक्त प्रवेश आहे. नव्या घोषणेमुळे, १ जुलैपासून चिनी बाजारपेठेत कुठलेही कर लागू न होणाऱ्या उत्पादनांची संख्या ८२५६ होणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. चीन किमान विकसित देशांना एक वर्षांच्या आत ९७ टक्केउत्पादनांसाठी आपल्या बाजारपेठेत करमुक्त प्रवेश देईल, असे या आठवडय़ात इंडोनेशियात झालेल्या आशियाई- आफ्रिकी परिषदेत चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी जाहीर केले होते.

परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज- हवाईदल प्रमुख

हैदराबाद : भारत-चीन सीमेवरील परिस्थितीचे हवाई दलाने पूर्ण विश्लेषण केले असून कुठल्याही आपत्कालीन स्थितीस तोंड देण्यास आम्ही सज्ज आहोत, असे हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी येथे शनिवारी सांगितले. दुंदिगल येथील हवाईदल अकादमीच्या दीक्षांत समारंभावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दल लडाखमध्ये भारतीय जवानांनी केलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.  भदौरिया म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असो की त्या बाहेरचा भाग असो आम्ही सर्व विश्लेषण केले आहे. कुठलीही परिस्थिती हाताळण्यास देशातील हवाई तळ सज्ज करण्यात आले असून चीनच्या छावण्या नेमक्या कुठे आहेत, त्यांचे हवाई तळ कुठे आहेत, त्यांनी सैन्य कुठे तैनात केले आहे, त्यांचे सक्रिय तळ कुठले आहेत या सगळ्याची माहिती आम्ही घेतली आहे. सर्व समझोत्यानंतरही चीनने आगळिक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chinas huge trade concessions to bangladesh abn

ताज्या बातम्या