लडाखमध्ये गलवान खोऱ्यासहित नियंत्रण रेषेवरील इतर ठिकाणांवर भारतीय जवानांसोबत झालेल्या संघर्षानंतर चिनी सैन्याला आपल्याला अजून चांगल्या प्रशिक्षण आणि तयारीची गरज असल्याची जाणीव झाली असल्याचं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. एएनआयशी बोलताना बिपीन रावत यांनी सांगितलं की, “चिनी सैनिकांना फार कमी काळासाठी सेवेत घेतलं जातं आणि त्यांना हिमालयातल्या डोंगराळ प्रदेशात लढण्याचा फारसा अनुभव नाही”.

नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांकडून काही हालचाली सुरु आहेत का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भारतीय सीमेलगत असणाऱ्या चिनी सैनिकांच्या तैनातीत बदल झाले आहेत. खासकरुन मे आणि जून २०२० मध्ये गलवान आणि इतर परिसरांमध्ये झालेल्या घटनांनंतर हे बदल पहायला मिळत आहे. आपल्याला अजून चांगलं प्रशिक्षण आणि तयारीची गरज असल्याची जाणीव त्यांना झाली आहे”.

गलवान संघर्ष : अनुत्तरित प्रश्नोपप्रश्न

“त्यांचे सैनिक हे जास्त करुन नागरी वस्तीतील आहेत. फार कमी काळासाठी ते सेवेत असतात. तसंच त्यांना या प्रकारच्या क्षेत्रात लढा देण्याचा आणि अशा भूप्रदेशात काम करण्याचा फारसा अनुभव नाही,” असंही रावत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान रावत यांनी परिसरातील चीनच्या सर्व हालचालींवर भारताकडून लक्ष ठेवलं जात असून भारतीय जवान लढा देण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचं म्हटलं आहे.

“तिबेटमधील डोंगराळ प्रदेशात काम करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षणाची गरज असते. आपल्या जवानांना मोठ्या प्रमाणात डोंगराळ प्रदेशातील युद्ध प्रशिक्षण देण्यात आलं असून ते यासाठी तयार आहेत. आपण डोंगराळ प्रदेशात ऑपरेट करतो आणि सतत तिथे आपली उपस्थिती दर्शवतो,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दरम्यान चिनी सैनिकांच्या प्रशिक्षणाचा हा भाग नसल्याचं ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी चिनी सैनिकांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज बोलून दाखवताना त्यासाठी नियंत्रण रेषेवर आपली उपस्थिती दर्शवण गरजेचं असल्याचंही म्हटलं आहे. तसंच नॉर्थन आणि वेस्टर्न दोन्ही फ्रंट देशाची प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.