बीजिंग : चीनचे तीन अवकाशवीर  शेनझाऊ १३ यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला. हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात राहणार असून चीनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अवकाश वास्तव्य मोहीम आहे.

जे तीन अवकाशवीर स्थानकात गेले आहेत त्यात झाई झियांग (५५), वँग यापिंग (४१), ये गुआंगफू (४१) यांचा समावेश आहे.  वँग ही अवकाश स्थानकात जाणारी पहिली चिनी महिला आहे. 

झाई यांनी उड्डाणापूर्वी सांगितले, की ‘‘अवकाश स्थानकात सहा महिने गुरूत्वाशिवाय राहणे आव्हानात्मक आहे. कारण त्याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो.’’ हे अवकाशवीर अवकाश औषधे व भौतिकशास्त्रातील प्रयोग करणार असून दोन ते तीन स्पेसवॉक करण्याचा त्यांचा विचार आहे.