चीन भारताबरोबरच हाँगकाँग आणि तैवानबद्दल कठोर भूमिका घेतानाचे चित्र मागील काही काळापासून दिसत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताला तैवानचा राष्ट्रीय दिवशी (Taiwan National Day) या प्रदेशाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करुन नये असा इशारा दिला आहे. तैवानचा राष्ट्रीय दिन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. मात्र भारताने तैवानला स्वतंत्र देश म्हणून वागणूक देऊ नये अशी चीनची अपेक्षा आहे. मात्र तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका ट्विटमधून चिनी प्रसारमाध्यमांना आणि जिनपिंग सरकारला जश्यास तसं उत्तर दिलं आहे.

दिल्लीतील चीनच्या भारतीय दुतावासाने भारतातील प्रसारमाध्यमांना एक चिठ्ठी पाठवली आहे. प्रसारमाध्यमांमधील आमच्या मित्रांना आम्ही आठवण करुन देऊ इच्छितो की जगामध्ये चीन का एकमेव आहे. जगभरामध्ये चीनचे प्रतिनिधित्व केवळ चीनमधील पिपल्स रिपब्लिक ऑफ चीनचे सरकार करते. त्यामुळेच तैवान स्वतंत्र्य देश असल्याचा उल्लेख करु नका. या देशातील साई इंग-वेन यांचाही उल्लेख राष्ट्राध्यक्ष असा करु नये. यामुळे सामान्यांमध्ये चुकीचा संदेश जातो, असं या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. चीनबरोबर राजकीय संबंध असणाऱ्या देशांना चीनच्या ‘वन चीन’ धोरणाची संपूर्ण कल्पना हवी आणि त्यांनी त्याचा सन्मान करावा. भारत सरकारही मागील बऱ्याच काळापासून हेच मान्य करत आलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनाही सरकारप्रमाणे चीनच्या वन चीन धोरणाचा स्वीकार करावा. प्रसारमाध्यमांनाही चीनच्या या धोरणाच्या विरोधात जाऊ नये, असंही पुढे म्हटलं आहे.

तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याचसंदर्भातील ट्विटला उत्तर दिलं आहे. या ट्विटमध्ये तैवानने, “भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. येथील प्रसारमाध्यमे ही बहुअंगी असून त्यांना स्वातंत्र्य आवडते. मात्र सध्या कम्युनिस्ट विचारसरणीचा चीन सर्व खंडामध्येच सेन्सॉरशीप लादण्याचा प्रयत्न करत आहे असं चित्र दिसत आहे. तैवानच्या भारतीय मित्रांकडून चीनला एकच उत्तर मिळू शकते. ते म्हणते खड्ड्यात जा,” असं म्हटलं आहे. एकीकडे चीन सरकार कायमच शांतता आणि चर्चेची तयारी दाखवते तर दुसरीकडे चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमे नेहमीच धमक्या देणं, इशारे देण्याचं काम करत असतात. भारत-चीन सीमाप्रश्नावरही जिनपिंग सरकारने चर्चेची भूमिका घेतलेली असतानाच चिनी प्रसारमाध्यमे मात्र युद्धाची भाषा करताना दिसून आले होते.

भारत आणि चीनमधील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्यानंतर भारत सरकारनेही हाँगकाँग आणि तैवानमधील मानावाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील काही प्रसारमाध्यमातून तैवानच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त विशेष वृत्तांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वृत्तवाहिन्या यासंदर्भातील विशेष कार्यक्रम दाखवणार आहेत. यामुळेच चीनचा तिळपापड झाला असून भारतीय प्रसारमाध्यमांसाठी त्यांनी या सूचना जारी केल्यात.

साई इंग-वेन या राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून चीन आणि तैवानमधील तणाव वाढला आहे. साई यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळामध्येच चीनच्या वन चायना धोरणाला विरोध केला. त्यानंतर चीनने तैवानबरोबरचे सर्व संबंध तोडले होते. चीनचा विरोध असल्यानेच तैवान जागतिक आरोग्य परिषदेचा सभासद होऊ शकला नाही. १० ऑक्टोबर रोजी तैवानमध्ये वुचांग पर्वाची सुरुवात होत आहे. याच दिवशी येथे तैवानवर राज्य करणाऱ्या चिनी सम्राज्याचा अस्त झाला होता. त्यानंतर रिपब्लिक ऑफ चीनची स्थापना झाली होती. सध्या चीन आणि तैवानमधील संबंध कामालीचे ताणले गेलेत. असं असतानाही तैवानने राष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.