बीजिंग : ‘‘हत्ती’ आणि ‘ड्रॅगन’ यांच्यातील बॅले (नृत्य) आणि दोन्ही देशांनी एकमेकांच्या यशामध्ये योगदान देणे हाच दोन्ही देशांतील संबंध पुढे नेण्यामध्ये एकमेव पर्याय आहे,’ असे उद्गार चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी शुक्रवारी काढले. भारत आणि चीनला उद्देशून त्यांनी अनुक्रमे ‘हत्ती’ आणि ‘ड्रॅगन’ अशी प्रतीके वापरली. पूर्व लडाखमधील तणाव निवळल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सकारात्मक होत असल्याचेही ते म्हणाले. वार्षिक पत्रकार परिषदेत वँग म्हणाले, ‘ सीमा भागात शांतता ठेवून सीमावादावर उपाय शोधण्याची क्षमता आणि शहाणपण भारत आणि चीन या दोन्ही प्राचीन सभ्यतांमध्ये नक्कीच आहे.
सीमावाद किंवा कुठलेही विशिष्ट मतभेद दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम करू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातील कझान येथील भेटीने द्विस्तरावरील संबंधांमध्ये अधिक प्रगती करण्यामध्ये सामरिक दिशा दिली. दोन्ही देशांनी त्यानंतर समान मुद्द्यांवर काम करून सर्व स्तरावर सहकार्य करून संबंध दृढ केले. एकमेकांना दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक आहे. हाच एक मार्ग दोन्ही देशांचे मूलभूत हितसंबंध जपू शकतो.’
अमेरिकेच्या करधोरणावर टीका
‘अमेरिकेने अचानक बदललेल्या करधोरणावर चीन प्रत्युत्तर देणे सुरू ठेवेल,’ असे सांगून एखाद्या चांगल्याशी सैतानाबरोबर गाठ पडली असल्याची उपमा त्यांनी दिली. वँग म्हणाले, ‘चीनवर दबाव टाकणे आणि चांगले संबंधही ठेवणे एकाच वेळी शक्य नाही. कुठल्याही देशाने तशी कल्पना करू नये. असा दुटप्पीपणा द्विस्तरावरील संबंधांसाठी आणि परस्परविश्वासासाठी चांगला नाही.’ आंतरराष्ट्रीय सहकार्याला अव्हेरून केवळ अमेरिकी हितांचा विचार ट्रम्प प्रशासन करीत असल्याचा संदर्भ देऊन वँग म्हणाले, ‘प्रत्येक देशाने अशीच भूमिका घेतली, तर जगात जंगलराज तयार होईल. त्यात लहान आणि दुर्बल देश प्रथम खाक होतील. आंतरराष्ट्रीय संतुलनाला मोठा धक्का बसेल.’