पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या ‘चायनीज मांजा’चा कहर पुन्हा एकदा समोर आला आहे. यश नावाच्या एका दुचाकीस्वाराने सोशल मीडियावर आपला थरारक अनुभव शेअर केला असून, सुरक्षित हेल्मेटमुळे त्याचा जीव कसा वाचला, याविषयी त्याने माहिती दिली आहे.
नेमकी घटना काय?
यश आपल्या मोटारसायकलवरून जात असताना अचानक त्याच्या समोर पतंगाची धारदार दोरी (मांजा) आली. हा मांजा इतका धारदार होता की, त्याने यशच्या ‘ॲक्सोर’ हेल्मेटचे बाहेरील टणक कवच आणि व्हिझर दोन्ही अक्षरशः कापले. यशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हेल्मेटवर झालेल्या खोल आणि खडबडीत जखमा स्पष्ट दिसत आहेत.
“जर मी हेल्मेट घातले नसते, तर आज जिवंत नसतो. हा मांजा माझ्या चेहऱ्यावर किंवा गळ्याला लागला असता, तर माझा जबडा कापला गेला असता किंवा जीव गेला असता,” असे यशने या व्हिडिओत म्हटले आहे.
वापरकर्त्यांनी व्यक्त केली चिंता –
अनेक वापरकर्त्यांनी चायनीज मांजाशी संबंधित धोक्यांबद्दल व्हिडीओच्या कमेंट्समध्ये चिंता व्यक्त केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “भारतात बंदी घातल्यानंतरही, हा चायनीज मांजा अजूनही बाजारात उपलब्ध आहे. काही लोक सुरक्षेपेक्षा मनोरंजनाला कसे प्राधान्य देतात हे पाहून वाईट वाटते. त्याच्या परिणामांचा विचार न करता इतक्या हानिकारक गोष्टीचा वापर करणे ही एक अत्यंत बेजबाबदार मानसिकता आहे.”
दुसऱ्या एकाने टिप्पणी केली, “काही रायडर्स आपल्याला आठवण करून देतात की, गाडी चालवताना हेल्मेट का काढू नये. तुम्ही सुरक्षित आहात याचा आनंद आहे.” तिसरा म्हणाला, “या धोकादायक वस्तू बाजारात का विकल्या जातात हे कळत नाही… भारतात जीवाला अजिबात किंमत नाही.” चौथ्याने पुढे म्हटले, “तुम्ही खरंच नशीबवान आहात, त्या हेल्मेटने अक्षरशः तुमचा जीव वाचवला.”
बंदी असूनही विक्री सुरूच
भारतात चायनीज मांजावर बंदी असूनही, बाजारात त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. हा मांजा अत्यंत लवचिक आणि धारदार असल्याने तो दुचाकीस्वारांसाठी ‘अदृश्य फास’ ठरत आहे. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला असून, “मनोरंजनासाठी इतरांचा जीव धोक्यात घालणे ही बेजबाबदार मानसिकता आहे,” अशी टीका केली आहे.
दुचाकीस्वारांच्या सुरक्षतेसाठी पुढील खबरदारी घेणे आवश्यक आहे –
- नेहमी ISI किंवा ECE प्रमाणित फुल-फेस हेल्मेट वापरा आणि गाडी चालवताना व्हिझर नेहमी खाली ठेवा.
- पतंगबाजीच्या काळात मान झाकण्यासाठी जाड मफलर किंवा नेक गार्डचा वापर करा.
- दुचाकीच्या पुढच्या बाजूला धातूची सुरक्षा तार किंवा ‘U’आकाराची सळई बसवून घ्या, ज्यामुळे मांजा तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कापला जाईल किंवा बाजूला होईल.
- पुलांवर किंवा फ्लायओव्हरवर मांजा मानेच्या उंचीवर लटकलेला असण्याची शक्यता जास्त असते, तिथे वाहनांचा वेग मर्यादित ठेवा.
