भारत आणि चीन सीमेवर बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. त्यातच अनेकदा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष देखील झाला आहे. याच दरम्यान, चीनच्या माध्यमांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये चिनी लष्कराने (पीएलए) गलवान खोऱ्यात संघर्षादरम्यान जखमी झालेल्या भारतीय सैनिकांना पकडले होते, असा दावा करण्यात आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चिनी सैनिक काही सैनिकांना पकडून चालताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, “चीनी सैन्याने पकडलेल्या जखमी भारतीय सैनिकांचा व्हिडिओ समोर आला आहे. हा गेल्या वर्षी गलवान खोऱ्यातील आहे?, भारतीय सैनिकांनी नियमांचे उल्लंघन केले आणि चिनी सैन्याच्या जवानांशी शारीरिक संघर्ष झाला.”

हा व्हिडिओ रिट्विट करताना सेवानिवृत्त आयएएस सूर्यप्रताप सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना लिहिले की, “हा त्रासदायक व्हिडिओ १८ तासांपूर्वी चीनच्या State-Affiliated मीडियाच्या हवाल्याने पोस्ट करण्यात आला आहे. चिनी सैन्याने जखमी केलेल्या भारतीय सैनिकांना गलवान खोऱ्यात पकडण्यात आलं आणि त्यांची अशी गंभीर अवस्था केली गेली. हे जर खरं असेल तर तुमचे ५६ इंच कुठे आहेत?” असा सवाल सिंह यांनी केलाय.

दरम्यान हा समोर आलेला व्हिडीओ नेमला कुठला आहे, याबद्दल पुष्टी करण्यात आलेली नाही. पण तो गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाशी जोडून चीनी माध्यमांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. एलएसीवर चिनी सैन्याच्या प्रक्षोभक कारवाया सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश सीमेवर चिनी सैनिक घुसल्याचे वृत्त आले होते. सुमारे २०० चीनी सैनिकांनी गेल्या आठवड्यात तिबेटमार्गे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती.