बीजिंग : चीनचा तैवानभोवती सुरू असलेला लष्करी सराव हा या एखाद्या हल्ल्याप्रमाणेच भयावह वाटत असल्याचा दावा तैवानने शनिवारी केला. अनेक चिनी युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा वारंवार ओलांडली.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ‘ट्वीट’ केले, की तैवानच्या संरक्षण दलांना सतर्क करण्यात आले आहे. तैवानच्या आसपास हवाई आणि नौदलाची गस्त घालण्यात येत आहे. कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी क्षेपणास्त्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी तैवानला भेट दिल्यानंतर संतप्त झालेल्या चीनने या आठवडय़ाच्या सुरुवातीला या परिसरात लष्करी सराव सुरू केला असून, पलोसी यांच्या तैवान भेटीमुळे अमेरिकेकडून ‘एक चीन धोरणा’चे उल्लंघन झाल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनने तैवान आपला भूभाग असल्याचा वारंवार दावा केला आहे. प्रसंगी तैवान बळजबरीने ताब्यात घेईन, अशी धमकीही दिली आहे. तैवानच्या ‘सेंट्रल न्यूज एजन्सी’ने सांगितले, की लष्कराने शुक्रवारी रात्री किनारी किनमेन परिसरात चार ‘ड्रोन’ उडताना पाहिले. ते चीनचे ‘ड्रोन’ होते, असा तैवानचा दावा आहे. त्याला प्रत्युत्तरादाखल तैवानच्या लष्कराने हवेत गोळीबार केला.

किनमेन हा तैवानचा बेट समूह असून, तो चीनच्या फुजियान प्रांतातील शहर शियानमेनच्या पूर्वेस दहा किलोमीटरवर आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन

तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी ‘ट्वीट’ केले, की आमचे सरकार आणि सैन्य चीनच्या लष्करी सरावावर बारकाईने लक्ष ठेवून आहे व गरजेनुसार प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी आंतरराष्ट्रीय समुदायाला लोकशाहीवादी तैवानला पािठबा देण्याचे आवाहन करतो, तसेच तैवानभोवतीच्या तणाव रोखण्यास मदत करण्याचेही आवाहन करतो.