white House Press Secretary wearing Made In China Lace Dress : अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापार युद्ध सुरू आहे. यादरम्यान एका चिनी अधिकाऱ्याने दावा केला आहे की व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलनी लेविट ( Karoline Leavitt) यांनी जे ड्रेस परिधान केला आहे तो चीनच्या कारखान्यात तयार झाला आहे. चिनी अधिकार्‍याने याचा पुरावा म्हणून कॅरोलनी लेविट आणि चिनी वेबसाईटचा फोटो देखील शेअर केला आहे.

इंडोनेशिया येथील डेनपसारमध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे कॉन्सुल जनरल म्हणून काम करणारे झांग झिशेंग यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर कॅरोलनी लेविट यांचा काळी लेस असलेला एक लाल ड्रेसमधील फोटो आणि एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ड्रेसच्या कॉलरवर लावलेली लेस ही त्यांच्या माबू टाऊन येथील कारखान्यात तयार करण्यात आली आहे तसेच हा ड्रेस देखील तेथेच तयार करण्यात आला आहे.

झिशेंग यांनी या फोटोंससह अमेरिकेवर टीका केली आहे. व्हाइट हाउसकडून चीनवर टीका केली जात असल्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे

त्यांनी या फोटोबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चीनवर आरोप करणे हाच व्यावसाय बनला आहे, चिनी माल जीवनाचा भाग आहे. व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरींच्या ड्रेसवर लावलेली लेस बद्दल बोलताना ते म्हणाले की, ड्रेसवरील सुंदर लेस ही एका चिनी कंपनीचे कर्मचारी त्यांचा प्रॉडक्ट असल्याचे सांगत आहेत. चिनी अधिकार्‍याने केलेल्या या दाव्याबद्दल व्हाईट हाऊस किंवा लेविट यांच्याकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

मात्र इंटरनेटवर वापरकर्ते मात्र यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांकडून चिनी अधिकाऱ्याकडून केला जात असलेला दावा खोटा असल्याचे सांगितले जात आहे. एका वापरकर्त्याने म्हटले आहे की लेविट यांनी परिधान केलेला ड्रेस हा अमेरिकेतच तयार झालेला असेल… चीनमध्ये याची कॉपी करण्यात आली असेल त्यामुळे कर्मचाऱ्याला असे वाटले असेल. तर दुसऱ्या एकाने लेविट यांच्यावर टीका करत चीनमध्ये तयार झालेली वस्तू परिधान करून चीनवर टीका करणं हे खूपच वाईट आहे.