पीटीआय, कोलंबो : श्रीलंकेच्या हंबन्टोटा या बंदरात चीनचे उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्य करणारे जहाज ‘युआन वँग ५’ मंगळवारी पोहोचले. या जहाजाच्या श्रीलंकेच्या बंदरातील वास्तव्याला भारताने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हेरगिरी होण्याची शक्यता असल्याचे भारताचे म्हणणे आहे. भारताच्या आक्षेपामुळे श्रीलंकेने चीनला या जहाजाचे आगमन स्थगित करण्यास सांगितले होते. मात्र, नंतर या जहाजाच्या आगमनास श्रीलंकेकडून शनिवारी परवानगी देण्यात आली होती.

या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढता (ट्रॅकिंग) येतो. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिण भागातील हंबन्टोटा या बंदरात स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी पोहोचले. या बंदरात त्याचे २२ ऑगस्टपर्यंत वास्तव्य असेल. हे जहाज ११ ऑगस्टला येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, श्रीलंकेच्या प्रशासनाकडून परवानगीस विलंब झाल्याने त्याच्या आगमनासही उशीर झाला. सुरक्षाविषयक चिंता व्यक्त करून भारताने श्रीलंकेवर विनाकारण आणलेला दबाव निर्थक असल्याची टीका चीनने केली होती. त्यानंतर श्रीलंका सरकारने भारत व चीनशी उच्चस्तरीय चर्चा केली. मैत्री, परस्पर विश्वास आणि भरीव संवादाद्वारे या जहाजास श्रीलंकेत येण्यास मान्यता देण्यात आल्याचे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवडय़ात निवेदनाद्वारे स्पष्ट केले. श्रीलंकेने स्पष्ट केले, की निर्धारित कालावधीत इंधन पुनर्भरणासाठी या जहाजास श्रीलंकेत थांबण्यास संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली. चीनच्या दूतावासाच्या विनंतीनुसार या जहाजाच्या श्रीलंकेतील वास्तव्यादरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार नाही. या जहाजास आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती श्रीलंका सरकारला चीनतर्फे करण्यात आली आहे.

शेजारी राष्ट्राच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य : श्रीलंका

श्रीलंका परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे, की शेजारी राष्ट्राशी सहकार्याला श्रीलंका सर्वोच्च प्राधान्य देत असून, या चिनी जहाजाच्या वास्तव्यकाळात शेजारी राष्ट्राच्या सुरक्षेस धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. श्रीलंकेच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाने या जहाजास सुरक्षा नियमांचे अथवा हस्तक्षेप न करण्याच्या अटीवर या जहाजावरील उच्च तंत्रज्ञानयुक्त उपकरणे वापरण्यासाठी ना-हरकत पत्र जारी केले आहे.