Chinese Ship Rich Starry breaks Hormuz Blockade: अमेरिकेने निर्बंध लादलेले चिनी जहाजाने मंगळवारी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. अमेरिकेच्या लष्कराने नाकेबंदी केल्यानंतर, होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारे हे पहिले जहाज ठरले आहे, असा दावा इराणने केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखले जाईल, असा इशारा दिल्या होता. पण, चिनी जहाजाने अमेरिकेची नाकेबंदी भेदल्यानंतर इराणने अमेरिकेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. “ट्रम्प यांना भीती वाटत नाही, अशा देशांसाठीच केवळ नाकेबंदी लागू आहे”, अशा शब्दात इराणने ट्रम्प यांना डिवचले.
चिनी जहाजाने भेदली नाकेबंदी
‘रिच स्टारी’ नावाचे एक मध्यम पल्ल्याचे जहाज होर्मुझ सामुद्रधुनी पार करून आता ओमानच्या आखातात दाखल झाले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, या जहाजावर मलावी देशाचा ध्वज होता पण, अमेरिकेने होर्मुझमध्ये नाकेबंदी केल्यानंतर सोमवारी हे जहाज माघारी फिरले. पण, जहाजावर चिनी कर्मचारी असल्याची माहिती दिल्यानंतर जहाजाला होर्मुझ पार करण्याची परवानगी देण्यात आली. अमेरिकेने सोमवारी रात्री साडेसात वाजता नाकेबंदी केल्यानंतर या पहिल्याच जहाजाने होर्मुझ पार केली आहे.
अमेरिकेने घातले होते निर्बंध
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली अमेरिका-इराण यांच्यातील शांती वार्ता निष्फळ ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी करण्याचा इशारा दिला होता. रात्री साडे सात वाजेपर्यंत दिलेली मुदत समाप्त झाल्यानंतर अमेरिकेच्या नौदलाने नाकेबंदीला सुरुवात केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ‘रिच स्टारी’ ही शांघाय शुआनरुन शिपिंग कंपनी लिमिटेडच्या मालकीची जहाज आहे.
इराणने अमेरिकेला डिवचले
इराणला ऊर्जा निर्बंध टाळण्यास मदत केल्याबद्दल, सुमारे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने जहाजाचा मालक आणि जहाज या दोघांनाही काळ्या यादीत टाकले होते. इराणने मात्र या संधीचा अमेरिकेला आणि पर्यायाने डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. “अमेरिकेला भीती वाटत नाही अशा देशांना केवळ ही नाकेबंदी लागू आहे”, अशी टीका इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केली. रिच स्टारी शिवाय आणखी दोना जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केल्याचा दावा इराणने केला आहे. यात रशियन आणि इराणी तेल वाहतूक केलेल्या जहाजाचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चीनसाठी होर्मुझचे महत्व
चीनसाठी होर्मुझ सामुद्रधुनी अत्यंत महत्वाचा समुद्रीमार्ग आहे. यातून ३८ टक्के तेल आणि २५ टक्के एलएनजी वाहतूक केली जाते. कच्चा तेलाची आयात करणारा चीन जगातील सर्वात मोठा देश आहे. दरम्यान, चीनने अमेरिकेला नाकेबंदीवरुन इशारा देखील दिला होता. “इराण आणि चीनमध्ये व्यापारी करार असून, आमच्या हस्तक्षेप करु नये”, असे त्यांनी स्पष्ट केले होते. अशात चीनच्या एका जहाजांना ऐन नाकाबंदीत होर्मुझ पार केल्याने इराणला टीकेची आयती संधी मिळाली.
