चीन सरकारवर केलेली टीका भोवली, जॅक मा यांची प्रतिष्ठित यादीतून गच्छंती

‘अलीबाबा’चे संस्थापक जॅक मा यांना चीन सरकारवर केलेली टीका भोवली

(File Photo :- Jack Ma, AP )

चीनमधील सर्वात नामांकित कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘अलीबाबा’चे संस्थापक जॅक मा यांना चीन सरकारवर केलेली टीका चांगलीच भोवली आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती झाली आहे.

जगातील आघाडीचे उद्योजक असलेल्या जॅक मा यांचं नाव चीनच्या सरकारी माध्यमाने (Shanghai Securities News) देशातील अव्वल उद्योजक नेत्यांच्या (Chinese entrepreneurial leaders) यादीतून हटवलं आहे. तर, या यादीमध्ये Huawei Technologies चे रेन झेंगफेई , शाओमीचे लेई जून ( Lei Jun) आणि बीवायडीचे (BYD) वांग चाउंफू ( Wang Chuanfu) यांनी दिलेल्या योगदानाचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मंगळवारी अर्थात अलिबाबा कंपनीने या तिमाहीतील ताज्या कमाईचा अहवाल सादर करण्यापूर्वीच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. जॅक मा यांच्याकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

काय म्हणाले होते जॅक मा :-
जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये जॅक मा यांनी देशात संशोधनाला वाव मिळत नाही असं मत व्यक्त करण्याबरोबरच जागतिक बँकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असं मत व्यक्त केलं होतं. “आजची आर्थिक व्यवस्था ही औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आहे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आपण आपली सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे,” असं परखड मत जॅक मा यांनी व्यक्त केलं होतं. जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर चीनमधील सरकारी यंत्रणांनी मा यांच्या अ‍ॅण्ट समुहाच्या आयपीओला दिलेली परवानगी नाकारली. या आयपीओची किंमत 37 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी असून सध्या याविरोधात चीनमधील सरकारी यंत्रणांनी एंटी-ट्रस्ट चौकशी सुरू केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chinese state newspaper omits name of jack ma from list of entrepreneurial leaders check details sas

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या