लडाखमध्ये उंचावरील पांगाँग तलावाच्या क्षेत्रात चिनी सैनिकांनी अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या लष्करी तुकडीने अलीकडेच, २७ जून रोजी भारतीय जलहद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराचे सैनिक त्यांना सामोरे गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, उधमपूर येथील प्रवक्ते कर्नल एस. गोस्वामी यांनी यासंबंधी अधिक काही बोलण्याचे टाळले.
चीनच्या सैनिकांनी लडाख भागात घुसखोरी करण्याच्या केलेल्या प्रयत्नांबद्दल परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यास विचारले असता देशाच्या सीमेवर तैनात करण्यात आलेले सैनिक अशा प्रकारच्या घुसखोरीला ‘योग्य प्रतिसाद’ देण्याकामी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
लडाखमधील तलावानजीक असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैनिक फिरताना आढळल्याची माहिती देण्यात आली. लेहपासून १६८ किलोमीटर अंतरावर पांगाँग तलावाच्या किनाऱ्यानजीक पूर्व लडाखमध्ये घुसखोरी झाल्याचे सांगण्यात आले.