कोणतीही नवी गोष्ट खरेदी केल्यानंतर त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण असतं, आणि जर अलिशान कार विकत घेतली तर आनंदाला पारावार नसतो. पण काही लोक तर इतके उत्साहित होतात की त्यांचा स्वतःवर ताबाच राहत नाही. असंच काहीसं घडलंय चीनमधल्या एका महिलेसोबत.

या महिलेने 4.5 कोटी रुपयांची एक लाल रंगाची चकचकीत फेरारी खरेदी केली. कार खरेदीनंतर महिला फार आनंदी आणि उत्साहित होती, मात्र थोड्याच वेळात तिचा आनंद तिच्या जीवनातल्या सर्वात वाईच अनुभवामध्ये बदलला. कारण, कार खरेदी केल्याच्या काही सेकंदांनंतरच ड्रायव्हिंग करताना महिलेचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यावरील दुभाजकाचा कठडा तोडून दुसऱ्या गाड्यांना धडकली.

त्यानंतर नव्याकोऱ्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातावेळी कारचा वेग कमी होता त्यामुळे महिलेला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही, पण कारचं मात्र खूप नुकसान झालं. अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने ती कार विकत घेतली नव्हती तर भाड्याने घेतली होती अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी नोंदवली आहे.