काळवीट शिकारप्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात राजस्थान सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे सलमान खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या खटल्यातील बलस्थाने आणि कच्च्या दुव्यांचा अभ्यास करून सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राजस्थानचे कायदामंत्री राजेंद्र राठोड यांनी दिली.
राजस्थान उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली होती. सलमान खान आणि अन्य सात जणांविरुद्ध काळवीट आणि चिंकाराची शिकार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटांची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २००७ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने घोडफार्म काळवीट शिकारप्रकरणी सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.



