Chinmay Deore Indian Student: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकेतून स्थलांतरितांची हकालपट्टी सुरूच आहे. अशात आता ट्रम्प प्रशासन अमेरिकेत व्हिसावर राहणाऱ्या लोकांनाही हद्दपार करण्यासाठी त्यांचा इमिग्रेशन स्टेटस रद्द करत आहे. अशाच एका प्रकरणात, आता अमेरिकेच्या गृह विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध चार परदेशी विद्यार्थ्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

हा खटला दाखल करणाऱ्यांमध्ये चिन्मय देवरे या भारतीय विद्यार्थ्याचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा इमिग्रेशन दर्जा कोणतीही सूचना किंवा माहिती न देता संपुष्टात आणण्यात आला आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे भारतीय विद्यार्थी चिन्मय देवरे आणि इतर तीन परदेशी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. चिन्मय देवरे कोण आहे आणि हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊया.

कोण आहे चिन्मय देवरे?

चिन्मय देवरे हा वेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेत आहे, असे मिशिगनच्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने विद्यार्थ्यांच्या वतीने दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे. तो २००४ मध्ये त्याच्या कुटुंबासह एच ४ डिपेंडेंट व्हिसावर अमेरिकेत गेला होता.

मिशिगनमध्ये हायस्कूलपर्यंतचे शिक्षण

२००८ मध्ये तो आणि त्याच्या कुटुंबाने अमेरिका सोडली होती. पण २०१४ मध्ये त्याचे कुटुंब पुन्हा अमेरिकेत परतले. मिशिगनमध्ये हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, चिन्मयने एच ४ दर्जाच्या व्हिसांतर्गत वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. जेथे तो २०२१ पासून संगणक शास्त्रात पदवीचे शिक्षण घेत आहे.

२०२२ मध्ये एफ-१ विद्यार्थी दर्जा

चिन्मयने मे २०२२ मध्ये एच ४ दर्जाच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्याने अर्ज केला होता. तेव्हा त्याला एफ-१ विद्यार्थी दर्जा देण्यात आला होता. मे २०२५ मध्ये त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होणार असून, त्यानंतर तो पदवीधर होईल. पदवीधर झाल्यानंतर चिन्मयने एफ-१ दर्जासह कायदेशीर नोकरी शोधण्याची योजना आखली. चिन्मय त्याच्या कुटुंबासह कॅन्टनमध्ये राहतो. खटल्यानुसार, चिन्मय देवरेवर अमेरिकेत कधीही कोणत्याही गुन्ह्याचा आरोप किंवा कोणत्याही प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आलेले नाही. तो कोणत्याही राजकीय मुद्द्यांवरून कॅम्पसमधील निषेधांमध्ये सहभागी नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर तीन परदेशी विद्यार्थ्यांचा इमिग्रेशन दर्जा रद्द

चिन्मय देवरे व्यतिरिक्त, इतर तीन विद्यार्थ्यांचा इमिग्रेशन दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यांनीही चिन्मयबरोबर न्यायालयातही धाव घेतली आहे. यामध्ये चिनी वंशाच्या जियांग्युनचा समावेश आहे. तो ऑगस्ट २०२३ पासून मिशिगन विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. दुसरी चीनी विद्यार्थीनी किउयी, मिशिगन विद्यापीठात पीएचडीची विद्यार्थिनी आहे. यामध्ये नेपाळच्या योगेश जोशी या विद्यार्थ्याचाही समावेश आहे.