Chirag Paswan Death Threat Letter: केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. “कट्टर दहशतवादी ठार करतील”, असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. अन्न प्रक्रिया खात्याचे केंद्रीय मंत्री असणारे चिराग पासवान यांना झेड प्लस सुरक्षा असून, ते लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहेत. पासवान यांना प्राप्त झालेल्या धमकीची माहिती त्यांच्या सचिवांनी गृह खात्याला दिली आहे.

पासवान यांच्याकडून गृहखात्याला पत्र

मंत्री चिराग पासवान यांच्या सचिवांनी याबाबत माहिती देणारे पत्र गृहखात्याला लिहले आहे. “आज मंत्रालयात दोन मोबाईल क्रमांक असणारे निनावी पत्र प्राप्त झाले आहे. पत्रात अन्न प्रक्रिया उद्योग खात्याचे मंत्र्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लवकरच कट्टर दहशतवादी तुम्हाला ठार करतील”, असे पत्रात लिहण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या धमकीच्या पत्राची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी विनंती देखील गृह खात्याकडे करण्यात आली आहे.

सुरक्षेत लक्ष घालण्याची विनंती

“या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी आणि प्रकरणाचा तपास करुन केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेचा विषयात लक्ष घालावे”, असे पासवान यांच्या सचिवांकडून लिहण्यात आलेल्यात पत्रात पुढे म्हटले आहे.

गृहखात्याला लिहलेल्या पत्रात काय म्हटलंय?

पासवान यांच्या कार्यालयाकडून लिहण्यात आलेल्या पत्राबरोबर धमकीचे पत्रही जोडण्यात आले आहे. “धमकीचे स्वरूप आणि कट्टर दहशतवाद्यांचा उल्लेख, ही अत्यंत गंभीर चिंतेची बाब असून मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. धमकीचे मूळ पत्र सोबत जोडले आहे,” असे पत्रात म्हटले आहे. पासवान यांच्या कार्यालयाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची, तसेच धमकी कोणी पाठवली आणि ती किती खरी आहे का याची चौकशी करण्याची विनंती केली. तसेच, पासवान यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचीही विनंती केली.