Bihar Assembly Election Results 2025 बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले असून एनडीए मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानेही (एलजेपी) या निवडणुकीत आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक जनशक्ती पक्षाला २९ जागा देण्यात आल्या होत्या, तर युतीतील मोठे भागीदार असलेल्या भाजपा आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. आतापर्यंत आलेली आकडेवारी दर्शवते की, चिराग पासवान २९ पैकी २१ जागांवर आघाडीवर आहे.
गेल्या निवडणुकीत मिळाली होती केवळ एक जागा
मुख्य बाब म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्षाला केवळ एकच जागा जिंकता आली होती. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ५ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हनुमान’ म्हणवणारे चिराग पासवान यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही आपली छाप पाडत असल्याचे चित्र आहे. दुपारी १२.४५ वाजेपर्यंत, लोक जनशक्ती पक्ष पाच टक्क्यांपेक्षा जास्त मतांच्या वाट्यासह मगध, सीमांचल आणि पाटलीपुत्र भागांतील अनेक जागांवर आघाडीवर आहे.
लोक जनशक्ती पक्षाच्या या कामिगिरीमुळे भाजपा, जेडीयू आणि लहान मित्रपक्षांनाही मोठी ताकद दिली आहे. एनडीएला नेमकी याच एकीकरणाची अपेक्षा असावी. विशेष म्हणजे ही लोक जनशक्ती पक्षाची आजवरची सर्वात प्रभावी आणि जबरदस्त कामगिरी आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत ते एकट्याने लढले होते आणि तेव्हा त्यांनी फक्त एकच जागा जिंकली होती. त्या तुलनेत ही एक थक्क करणारी कामगिरी आहे.
२०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने १३७ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि चिराग पासवान यांच्या नितीश यांच्याविरोधातील तीव्र प्रचारामुळे जेडीयूच्या मतांमध्ये फूट पडली होती. त्यामुळे जेडीयूचा जागांचा आकडा २०१५ मधील ७१ वरून थेट ४३ वर आला होता. आता, लोक जनशक्ती पक्ष २०२५ मध्ये एनडीएमध्ये पूर्णपणे समाविष्ट होऊन लढल्यामुळे, चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मजबूत निकाल दिला आहे.
त्याबरोबरच ‘व्होट ट्रान्सफर’ सुरळीत झाल्यामुळे नितीश यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूच्या जागा वाढविण्यातही मदत केली आणि एनडीएच्या एकूण जागांमध्येही वाढ केली आहे. बिहारमधील या विजयामुळे चिराग यांचे एनडीएमधील महत्त्व आणखी वाढणार आहे आणि यामुळे बिहारमधील युतीचे अंतर्गत समीकरण बदलणे निश्चित आहे, विशेषतः लोक जनशक्ती पक्ष आणि जेडीयू यांच्यातील दीर्घकाळ चाललेला तणाव पाहता.
