बिहारमध्ये होणार राजकीय भूकंप : चिराग पासवान यांच्याविरुद्ध पाचही खासदारांचं बंड

राम विलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पार्टीची सूत्रं आली… आता पाचही खासदार त्यांच्याविरोधात बंड करण्याच्या तयारीत

chirag paswan, ljp, bihar politics
राम विलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पार्टीची सूत्रं आली… आता पाचही खासदार त्यांच्याविरोधात बंड करण्याच्या तयारीत. (Express photo by Prem Nath Pandey)

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसत आहे. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या पाचही खासदारांनी बंडांचं निशाण फडकावलं असून, पक्षात फूट पडली असल्याचं समोर आलं आहे. चिराग पासवान यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं असल्याचं वृत्त आहे. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या खासदारांनी केली आहे. पाचही खासदार पक्षांतर करण्याच्या वाटेवर असून, असं झाल्यास लोक जनशक्ती पार्टीला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, हे पाचही खासदार नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.

लोक जनशक्ती पार्टीची सूत्रं चिराग पासवान यांच्याकडे आल्यापासून पाचही खासदार नाराज होते. बिहार विधानसभा निवडणूक जदयू आणि भाजपासोबत न लढत स्वतंत्र लढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतल्यानं खासदारांच्या नाराजीत आणखी भर पडली होती. तेव्हापासूनच लोक जनशक्ती पार्टी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती. पण या दिशेनं कधी पावलं टाकली जाणार याबद्दल मात्र, खात्रीने कुणीही बोलत नव्हतं.

या बंडामागे चिराग पासवान यांचे काका आणि हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार पशुपती कुमार पारस हे असल्याचं बोललं जात आहे. चिराग पासवान मनमानी कारभार करत असल्यानं ते नाराज होते आणि जदयू खासदाराच्या संपर्कात होते. या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत चिराग पासवान यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. आपल्याला वेगळा गट समजण्यात यावं, असं या खासदारांनी पत्रात म्हटलेलं आहे.

पशुपती कुमार पारस (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशर अशी बंडाच्या तयारीत असलेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या खासदारांची नाव आहेत. एकाच वेळी पाच खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं वृत्तानंतर लोजपासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. हे पाचही खासदार नितीश कुमार यांच्या जदयूमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. हे खासदार बंड करणार असल्याच्या वृत्तावर चिराग पासवान यांनीही भूमिका मांडली आहे. “मी माझ्या वडिलाच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर आलोय, तर या धक्क्यातूनही बाहेर येईनच,” असं त्या्ंनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chirag paswan ljp mps pashupati paras jdu bihar politics rebel against chirag paswan bmh