Who will be the Bihar Deputy CM बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले असून एनडीए मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानेही (राम विलास) या निवडणुकीत आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोक जनशक्ती पक्षाला २९ जागा देण्यात आल्या होत्या, तर युतीतील मोठे भागीदार असलेल्या भाजपा आणि जेडीयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. आतापर्यंत आलेली आकडेवारी दर्शवते की, चिराग पासवान २९ पैकी २१ जागांवर आघाडीवर आहे.
चिराग पासवान यांच्या पक्षाने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि जेडीयूनंतर युतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवल्याचे चित्र आहे. नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्रिपद स्वीकारतील हे स्पष्ट आहे. मात्र, लोक जनशक्ती पक्षाच्या या दमदार कामगिरीनंतर चिराग पासवान उपमुख्यमंत्रिपदाची मागणी करतील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी व त्यांच्या पक्षाने याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते.
चिराग पासवान उपमुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?
या आठवड्याच्या सुरुवातीलाच चिराग पासवान यांना उपमुख्यमंत्रिपदावर दावा करण्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले होते की, एनडीएला निर्णायक बहुमत मिळाल्यास त्यांचा पक्ष हा दावा करेल. आजच्या निकालावरून हे स्पष्ट होत आहे की, एनडीए ऐतिहासिक बहुमताकडे वाटचाल करत आहे. (२४३ सदस्यांच्या सभागृहात सुमारे २०० जागांवर आघाडी किंवा विजय). तसेच एलजेपी युतीतील वाट्याला आलेल्या २९ जागांपैकी २० हून अधिक जागा जिंकत आहे.
चिराग पासवान यांनी इंडिया टुडेला सांगितले होते, माझा स्ट्राइक रेट (विजय दर) नेहमीच १०० टक्क्यांच्या जवळ राहिला आहे आणि यावेळीही मला तीच अपेक्षा आहे आणि त्यांनी या कामगिरीचा संबंध उपमुख्यमंत्रिपदाच्या अपेक्षेशी जोडला होता. चिराग पासवान म्हणाले, “माझा विश्वास आहे की युतीमध्ये आदर असला पाहिजे. तुमचे भागीदार चांगली कामगिरी करत असतील, तर त्यांना त्याचे बक्षीस मिळाले पाहिजे.” ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर केंद्रात आधीच महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. अन्न प्रक्रिया क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे आणि मला हे मंत्रालय आणखी मजबूत करायचे आहे.”
ते पुढे म्हणाले होते, “सध्या मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. पण, होय, जर आम्ही जिंकलो तर माझ्या पक्षातील काही नेते नक्कीच ते पद सांभाळतील.” हे निकाल एलजेपीसाठी राज्य पातळीवर एक मोठे कमबॅक सिद्ध होत आहेत. २०२० मध्ये, चिराग यांनी एनडीएशी किंवा इतर कोणाशीही युती न करण्याचा निर्णय घेतला होता आणि १३० हून अधिक जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली होती. यावेळी, त्यांच्या पक्षाला एनडीएने लढण्यासाठी २९ जागा दिल्या, ज्यावर इतर सहयोगी पक्षांचे फारसे मतैक्य नव्हते.
चिराग पासवान यांचे भाजपा अन् मोदींवरील प्रेम
युतीमध्ये असो वा नसो, चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरील आपले प्रेम सतत व्यक्त केले आहे. २०२० मध्ये त्यांचा वाद नितीश कुमार यांच्याशी होता, असे त्यांनी सांगितले होते. जेडीयूनेही २०२० मध्ये त्यांचा स्ट्राइक रेट खराब होण्याचे एक प्रमुख कारण चिराग पासवान असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून आतापर्यंत, त्यांचे दिवंगत वडील राम विलास पासवान यांनी स्थापन केलेल्या एलजेपीमध्ये फूट पडली आणि त्यांचे काका पशुपती नाथ पारस मोदींबरोबर गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती बदलली. चिराग पुन्हा भाजपाप्रणित एनडीएच्या गटात परतले, लोकसभेची जागा जिंकली आणि मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्री झाले.
