पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील राजपुरा येथील चितकारा विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीने कथितरीत्या आत्महत्या केली होती आणि आता तिचा आत्मा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास देत आहे अशा अफवा पसरल्या. विद्यापीठाच्या आवारात भूत असल्याच्या अफवा विद्यार्थ्यांमध्ये पसरल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांनी २५ आणि २६ सप्टेंबरच्या रात्री विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केलं.

या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये शा‍ब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कॅम्पसमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना शांत करण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पण या दरम्यान काही विद्यार्थी आणि पोलीस कर्मचारी यांच्यात झटापट झाली. त्यानंतर अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागलं, यामध्ये पोलिसांच्या एका सरकारी वाहनाचंही नुकसान झालं.

यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याशी विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे., तर संबंधित पोलीस अधिकारी मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या आरोपानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

विद्यार्थ्यांमध्ये अफवा का पसरल्या?

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीने कथितरीत्या आत्महत्या केली होती आणि आता तिचा आत्मा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास देत आहे अशा अफवा पसरल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र, विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी अशी कोणतीही आत्महत्या झाली नसल्याचं सांगत या अफवा फेटाळून लावल्या. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी इतर विद्यार्थ्यांच्या खोल्यांचे दरवाजे ठोठावून पळून जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जातात.

पोलिसांनी काय म्हटलं?

डीएसपी सुखदेव सिंग यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, “आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थिनीचं नाव किंवा ओळख समोर आलेली नाही. कोणत्या दोन विद्यार्थिनी बेपत्ता आहेत, याबाबतही कोणत्याही विद्यार्थ्याकडे माहिती नाही. पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून तक्रारी स्वीकारल्या आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल. पोलीस प्रत्येक दाव्यांची पडताळणी करतील. जर एखादी विद्यार्थिनी खरोखर बेपत्ता असेल तर त्याबाबतही पोलीस तपास करतील आणि कायद्यानुसार कारवाई करतील. विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केलेली आहे आणि आम्ही ते तपासणार आहोत”, असं सिंग यांनी म्हटलं.