scorecardresearch

“मुख्यमंत्र्यांमुळे राज्यात जादूटोणा वाढला” म्हणणाऱ्या शिवसेनेला चित्रा वाघ यांचं प्रत्त्युत्तर; म्हणाल्या, “कार्यकारी संपादक बाहेर आले, तेव्हापासून…”

एकनाथ शिंदे यांचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती.

“मुख्यमंत्र्यांमुळे राज्यात जादूटोणा वाढला” म्हणणाऱ्या शिवसेनेला चित्रा वाघ यांचं प्रत्त्युत्तर; म्हणाल्या, “कार्यकारी संपादक बाहेर आले, तेव्हापासून…”
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

एकनाथ शिंदे यांचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे. तसेच राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे, अशी टीका आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे-भाजपा सरकारवर करण्यात आली होती. दरम्यान, यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. चित्रा वाघ सध्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी दिल्लीत असून त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “निवडणूक आयोगाने तुमच्या कानात…”, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाल्या, “शिरसाटांसारखा माणूस…!”

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून त्यांचे मनस्वास्थ ठीक नाही. हे आता त्यांच्या कृतीतून आणि लेखणीतून जाणवू लागलं आहे. त्यामुळे यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे कोणत्याही अंधश्रद्धेला थारा नाही. हे महाराष्ट्रातला प्रत्येक जण जाणतो, असं प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिले. दरम्यान, वेळी त्यांनी शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात होणाऱ्या सुनावणीबाबतही प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाचा जो निकाल असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल. आज याबाबत स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – नाशिक पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणाला? अजित पवार म्हणाले, “आम्ही…”

शिवसेनेने नेमकी काय टीका केली होती?

आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे सरकार टीकास्र सोडण्यात आले होते. ”महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयांत होत असते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले”, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. तसेच ”शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही”, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 14:34 IST

संबंधित बातम्या