Christa Pike death penalty: अमेरिकेतील टेनेसी राज्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या क्रिस्टा पाइक हिला प्राणघातक इंजेक्शनचे दोन डोस देण्यात आले, मात्र त्यानंतरही तिचं हृदय धडधडत असल्याचे आढळले. त्यानंतर तिला कारागृहाबाहेरील रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्या वकिलांनी शिक्षेची प्रक्रिया थांबवण्यासाठी तातडीचा अर्ज दाखल केला. टेनेसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शननेही पाइकला रुग्णालयात हलवल्याची पुष्टी केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त बीबीसी न्यूजने दिले आहे.
दोन इंजेक्शननंतरही हृदयाची धडधड सुरू
३० सप्टेंबरच्या रात्री नॅशव्हिलमधील ‘रिव्हरबेंड मॅक्सिमम सिक्युरिटी इन्सिट्यूशन’मध्ये पाइकला पेंटोबार्बिटॉलचे दोन डोस देण्यात आले. तिला वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या आपत्कालीन अर्जात पाइक बेशुद्ध झाली असली तरी तिचं हृदय धडधडत असल्याचे नमूद केले. वकिलांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूदंडाची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पूर्ण न झाल्यानंतर तिला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.
१९९५ मध्ये १९ वर्षीय तरुणीची हत्या
क्रिस्टा पाइकला १९९५ मध्ये १९ वर्षीय कॉलिन स्लॅमर हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. गुन्हा घडला तेव्हा पाइक १८ वर्षांची होती. तिच्याबरोबर असलेल्या टॅडारिल शिप याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयीन नोंदींमध्ये नमूद आहे. मात्र तो गुन्हा घडला तेव्हा १७ वर्षांचा असल्याने त्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली नाही. पाइकला १९९६ मध्ये मृत्युदंड सुनावण्यात आला होता. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी तिच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
मृत्युदंडाच्या अंमलबजावणीच्या काही तास आधीही कायदेशीर लढाई
पाइकच्या वकिलांनी शिक्षा थांबवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न्यायालयीन लढा दिला. तिच्या बचाव पक्षाने बालपणी लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचा इतिहास आणि इतर मानसिक आरोग्याशी संबंधित बाबी न्यायालयासमोर मांडल्या होत्या. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मात्र शिक्षेला स्थगिती देण्याचे प्रयत्न फेटाळल्यानंतर प्रक्रिया पुढे गेली. टेनेसीचे राज्यपाल बिल ली यांनीही पाइकची दया याचिका फेटाळली होती.
राज्यपालांकडून स्वतंत्र चौकशीचे आदेश
मृत्युदंडाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर टेनेसी सरकारने या घटनेचा सखोल आढावा घेण्याची घोषणा केली आहे. राज्यपाल बिल ली यांनी स्वतंत्र संस्थेमार्फत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, वर्षातील उर्वरित नियोजित शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, टेनेसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनने आपल्या कर्मचाऱ्यांनी राज्याच्या मंजूर प्रोटोकॉलनुसारच कारवाई केल्याचे म्हटले आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, वापरण्यात आलेले प्राणघातक इंजेक्शन आणि मृत्युदंडाची प्रक्रिया राज्याच्या अधिकृत नियमांनुसारच होती.
अमेरिकेत महिला कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा दुर्मिळ
अमेरिकेत १९७६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा लागू केल्यापासून आतापर्यंत १८ महिलांना मृत्युदंड देण्यात आला आहेत, तर पुरुषांची संख्या दीड हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पाइकची शिक्षा ही टेनेसीमध्ये विशेष लक्षवेधी ठरली होती.
आता दोन प्राणघातक इंजेक्शननंतरही पाइक जिवंत राहिल्याने तिची पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय स्थिती काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मृत्युदंडा देण्याच्या प्रयत्नात नेमकं काय चुकलं, याची स्वतंत्र चौकशी होणार आहे.
