‘पोलिसांनी मला अटक केली नसती, तर मी वॉशिंग्टनला जाऊन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या डोक्यात गोळी घातली असती’, असे ओबामा यांच्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या इसमाने तुरुंगातून एका दूरचित्रवाहिनीला फोन करून सांगितले आहे.
ख्रिस्तोफर ली कॉर्नेल (२०) याला केंटुकी येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आपण इस्लामिक स्टेट गटाचा समर्थक असून, अमेरिकेने दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या हवाई हल्ल्यांचा वचपा म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना ठार मारण्याची योजना आपण आखल्याची कबुली त्याने सिनसिनाटी येथील एका दूरचित्रवाहिनीला दूरध्वनी करून दिली. या दूरचित्रवाहिनीने शुक्रवारी रात्री या मुलाखतीचा काही भाग प्रक्षेपित केला.
तुला जानेवारीत अटक झाली नसती तर तू काय केले असतेस, असा प्रश्न मुलाखतकर्त्यांने कॉर्नेलला विचारला, तेव्हा तो म्हणाला : मी माझ्याजवळची एक बंदूक घेतली असती, ती ओबामांच्या डोक्याला लावली असती आणि ट्रिगर दाबला असता. त्यानंतर मी सिनेटच्या तसेच प्रतिनिधी सभेच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) सदस्यांवर आणखी गोळ्या झाडल्या असत्या आणि इस्रायली राजदूतावासासह इतर अनेक इमारतींवर हल्ला केला असता. अमेरिकेचे आमच्या लोकांवर सतत सुरू असलेले आक्रमण आणि अमेरिका, विशेषत: अध्यक्ष ओबामा इस्लामिक स्टेटविरुद्ध युद्ध छेडू इच्छित असल्यामुळे मी हा हल्ला करायचे ठरवले, असे स्वत:ला मुस्लीम म्हणवून घेणाऱ्या कॉर्नेलने सांगितले.
मी दहशतवादी आहे असे कदाचित ते म्हणतील, पण आम्ही अमेरिकी सैन्यालाही दहशतवादी म्हणूनच पाहतो, जे आमच्या भूमीवर येतात, आमची संसाधने चोरतात, आमच्या लोकांना ठार मारतात आणि आमच्या स्त्रियांवर अत्याचार करतात, असेही कॉर्नेल म्हणाला. ‘आम्ही अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात आहोत, तुम्हाला वाटते त्यापेक्षा आम्ही अधिक संघटित आहोत’, असे सांगून इसिसला व्यापक पाठिंबा असल्याचा दावा त्याने केला. कॉर्नेलवर जे दोन आरोप लावण्यात आले आहेत, त्यासाठी त्याला शिक्षा झाल्यास प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.