उबर आणि ओला टॅक्सी बुक करुन आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचणं हे आता बऱ्यापैकी नित्याचं झालं आहे. तरीही अनेकदा उबर किवा ओला कॅबची चर्चाही होत असते. आता पुन्हा एकदा उबरची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एका महिलेने सांगितलेला तिचा थरारक अनुभव. एका महिलेने एक पोस्ट लिहून तिला आलेला अनुभव सांगितला आहे. या महिलेने आरोप केला आहे की राईड सुरु असताना हा चालक सातत्याने फोनवर बोलत होता. तसंच त्याला काही विचारलं किंवा त्याला काही सांगायला गेलं की उद्धटपणे अंगावर खेकसत होता.
अँजेलीका या महिलेने केली पोस्ट
Angellica या महिलेने दिल्लीतल्या गुडगाव या ठिकाणी आलेला तिचा अनुभव पोस्ट केला आहे. तिने म्हटलं आहे की मी गुडगावहून दिल्लीला जाण्यासाठी अॅपवरून उबर एक्सएल ही कॅब बुक केली. मी कारमध्ये बसले तेव्हापासून त्या कारचा चालक सातत्याने त्याच्या मित्राशी फोनवर बोलत होता. त्याने चुकीचा मार्ग निवडला आणि मला तो तिथून घेऊन जाऊ लागला.
असुरक्षित वाटलं पण पॅनिक बटण नव्हतं
ही महिला पुढे म्हणाली की मी जेव्हा फोनवर बोलण्यासाठी ड्रायव्हरला हटकलं तेव्हा तो म्हणाला की चुपचाप बसून राहा. त्यानंतर तो माझ्यावर खेकसून बोलत होता. मला कारमध्ये असुरक्षित वाटू लागलं होतं. पण कारमध्ये पॅनिक बटण नव्हतं. ही महिला म्हणाली की मी यानंतर उबर इंडियाला तक्रार केली आणि सदर चालकाबाबत सांगितलं. त्याचे तपशील चुकीचे आहेत आणि ड्रायव्हर लिस्टेड नाहीत असंही सांगितलं. तुम्ही चुकीच्या ओळखीसह असलेली कार कशी काय पाठवता असाही सवाल मी त्यांना केला. त्यावर उबरने रिप्लाय केला की जे काही घडतं आहे ते काळजी करण्यासारखं आहे. तुमची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे. तुमच्या ट्रीपचे सगळे तपशील आम्हाला पाठवा. आमची सेफ्टी टीम तुमच्यापर्यंत लवकरच पोहचेल. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. अँजेलीका यांनी सांगितलं की मी त्यानंतर त्यांना डायरेक्ट मेसेज केला. पण हा अनुभव आठवला की माझ्या अंगावर अजूनही काटा येतो असं या महिलेने म्हटलं आहे. ज्यानंतर या महिलेच्या पोस्टवर सोशल मीडियावरचे युजर्स रिप्लाय देत आहेत.
नेटकऱ्यांनी या घटनेबाबत काय म्हटलं आहे?
अँजेलिया या राजकीय चळवळकर्त्या आहेत. त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे अनुभव पोस्ट केले आहेत. एका युजरने म्हटलं आहे उबर सारख्या टॅक्सी सेवेत महिलांची सुरक्षा हा मुद्दा कायमच ऐरणीवर राहिला आहे. काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत की महिला सुरक्षेचा मुद्दा उबरमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. एका महिलेने सांगितलं की तुम्हाला जो अनुभव आला तसाच एक अनुभव मलाही आला आहे. मी जी कॅब बुक केली त्या कॅबचा चालक दारू प्यायला होता. मी उबरला जेव्हा याबाबत कळवलं तेव्हा त्यांनी त्या चालकाला कामावरुन कमी केलं. आणखी एका युजरने सांगितलं की हल्ली हे असले प्रकार नित्याचेच झाले आहेत. मलाही अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. अशा पद्धतीने लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.
