राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी अमेरिकेचे गुप्तहेर विल्यम बर्न्स यांची दिल्लीत भेट घेतली. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता चालवणाऱ्या लोकांची नावे जाहीर केली असतानाच या दोघांमध्ये बैठक झाली आहे. तालिबानने जाहीर केलेल्या नावांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या एका व्यक्तीच्या नावाचा पंतप्रधान म्हणून समावेश आहे.

अजित डोवाल आणि सीआयए प्रमुख यांच्यामध्ये काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षे संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या भेटीत अफगाणिस्तानमधील घडामोडींबाबत भारताने चिंता व्यक्त केली असू शकते. भारताला लक्ष्य करण्यासाठी आणि विशेषत: जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी तालिबान अफगाणिस्तानमधून दहशतवादी गटांना ऑपरेट करू देणार नाही, अशी अपेक्षा यापूर्वी भारताने व्यक्त केली होती.

दरम्यान, डोभाल आज दिल्लीत रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाई पत्रुशेव यांचीही भेट घेत आहेत. चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

रशियातील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी सांगितले की, “दोहामध्ये तालिबानशी झालेल्या चर्चेचे योग्य परिणाम झाले नाहीत. भारत दोहा चर्चेत थेट सहभागी नव्हता आणि ट्रोइका प्लस यंत्रणेचा भाग देखील नव्हता. परंतु याचे योग्य परिणाम आलेले नाहीत. त्यामुळे मला वाटते की, भारत आणि रशियाने अफगाणिस्तानसंदर्भात सोबत काम करायला पाहिजे.”

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेप करणे हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानने सीमा ओलांडून हिंसाचाराची संस्कृती अद्यापही कायम ठेवली आहे. तसेच इस्लामाबादने भारताविरुद्ध द्वेषयुक्त भाषणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर केल्याबद्दलही भारताने मंगळवारी टीका केली.