कनिमोळी यांनी हिंदीत उत्तर न दिल्यानं सुरक्षा अधिकाऱ्यानं नागरिकत्वावरच केला सवाल; म्हणाला…

विमानतळावरील घटना

द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सुरक्षा अधिकाऱ्यानं तुम्ही भारतीय आहात का? असा प्रश्न विचारल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका विमानतळावर आज ही घटना घडली असून, कनिमोळी यांनी ट्विट करून याची माहिती दिली. “केवळ विशिष्ट धर्माचे असल्यानं वा भाषा येत नसल्यानं तुमचं भारतीयत्व कमी होत नाही,” असं म्हणत कनिमोळी यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीआयएसएफनं दिले आहेत.

द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी या घटनेची ट्विट करून माहिती दिली. तसेच अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. “आज विमानतळावर एका सीआयएसएफ अधिकाऱ्याला मी तामिळ किंवा इंग्रजीतून बोलण्यास सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं मला विचारलं की, मी भारतीय आहे का? कारण मला हिंदी येत नाही. मला जाणून घ्यायचं की हिंदी येणं हे भारतीयत्वाच्या समान आहे का?,” असं कनिमोळी यांनी म्हटलं आहे.

कनिमोळी यांनी ट्विट केल्यानंतर ही घटना प्रसारमाध्यमातून चर्चेत आली. त्यानंतर सीआयएसएफनं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. “कोणत्यातही विशिष्ट भाषेचा आग्रह धरणं हे सीआयएसएफचं धोरण नाही,” असं सीआयएसएफनं ट्विट करून म्हटलं आहे. सीआयएसएफकडून घेण्यात आलेल्या चौकशीच्या निर्णयाबद्दल कनिमोळी यांनी आभार मानले आहेत.

फक्त आपण एका विशिष्ट धर्माचे नसल्यामुळे वा एखादी भाषा बोलता येत नसल्यानं आपल भारतीयत्व कमी होत नाही. देशाचं मोठेपण त्याच्या विविधतेत आणि सर्वसमावेशकतेचा स्वीकार यामध्ये आहे. आपण ते कुठेतरी गमावत आहोत, असं मला वाटतं,” अशी प्रतिक्रिया कनिमोळी या घटनेवर बोलताना व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cisf orders probe after officer questions kanimozhis nationality bmh

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या