CJP Shivaji Park Protest Complaint : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात परवानग्या नाकारलेल्या असतानाही रस्त्यावर आंदोलन केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी आणि वकील सिद्धी देवळेकर यांनी कॉक्रोच जनता पार्टीविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
मतदार याद्यांमधील अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने सर्व वयोगटातील आणि स्तरातील नागरिक उपस्थित होते, असा दावा आयोजकांनी केला. पोलिसांकडून निर्बंध असतानाही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन
वकील सिद्धी देवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीजेपी’ (CJP) च्या संस्थापकांनी शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाचे आयोजन केलं होतं. मात्र, शिवाजी पार्क पोलिसांनी आयोजक अजिंक्य शिंदे यांना पत्र पाठवून या आंदोलनाला स्पष्टपणे नकार दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ जानेवारी २०१३ च्या आदेशानुसार शिवाजी पार्क परिसरात अशा प्रकारे आंदोलन करण्यास बंदी आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. तरीही न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आंदोलन रस्त्यावरच करण्यात आले.
“आंदोलन करा, पण नियुक्त ठिकाणी”
प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धी देवळेकर म्हणाल्या, “मी गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्कच्या अगदी समोर राहते. माझा कोणाच्याही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराला विरोध नाही. प्रत्येकाला निषेध नोंदवण्याचा हक्क आहे, पण त्यासाठी सरकारने जागा ठरवून दिल्या आहेत. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करायची असेल, तर आझाद मैदान किंवा दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे. लोकांच्या घरांसमोर रस्ते अडवून आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे?”
मुंबई पोलिसांचे मानले आभार
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक रहिवाशांनी एकत्र येत पोलीस ठाणे गाठले होते. यावर बोलताना देवळेकर यांनी मुंबई पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलं. “आम्ही जेव्हा तक्रार घेऊन गेलो, तेव्हा मुंबई पोलिसांनी आम्हाला तात्काळ सहकार्य केलं आणि सुरक्षेचं आश्वासन दिलं. आम्ही पोलिसांच्या भूमिकेवर समाधानी असून, या बेकायदेशीर आंदोलनाचे आयोजन करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी आशा आहे”, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.
…तर १० ऑक्टोबरला जंतर मंतर येथे आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्ता ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास देशभरातील आंदोलनकर्ते १० ऑक्टोबरला दिल्लीत दाखल होऊन जंतरमंतर येथे आंदोलन करतील, असा इशारा दिपके यांनी दिला. मुंबईनंतर गोवा, हैदराबाद, कोलकाता, पटणा, बेंगळूरु, रांची अशा देशाच्या विविध भागात सीजेपीचे आंदोलन होणार आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्यास ज्या ठिकाणी अडविले जाईल, तेथेच आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
