लोकपालसाठीच्या स्पर्धेत आपण नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. लोढा यांनी सोमवारी स्पष्ट केले. हे पद स्वीकारण्यास तयार असणाऱयांमध्ये माझा क्रमांक सर्वांत शेवटचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकपाल निवड मंडळासाठी सरन्यायाधीश पी. सथाशिवम यांनी त्यांचे ज्येष्ठ सहकारी एच. एल. दत्तू यांची शिफारस केल्याची माहिती उच्चस्तरिय सूत्रांनी दिली. सरन्यायाधीशांमध्ये सेवाज्येष्ठतेमध्ये दत्तू हे तिसऱया क्रमांकावर आहेत. न्या. लोढा दुसऱया क्रमांकावर आहेत.
दत्तू यांची लोकपाल निवड मंडळावर निवड करण्यात आल्यामुळे आता न्या. सथाशिवम आणि न्या. लोढा यांचीही लोकपाल म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हा खुलासा केला. सथाशिवम हे येत्या २६ एप्रिल रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर न्या. लोढा यांची नियुक्ती होऊ शकते. लोढा हे २७ सप्टेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांना सरन्यायाधीशपदावर पाच महिने काम करण्यास मिळेल. त्यांच्यानंतर न्या. दत्तू यांची सरन्यायाधीशपदावर नियुक्ती होऊ शकते आणि त्यांना त्या पदावर एक वर्ष काम करण्याची संधी मिळेल.
लोकपाल कायदा अस्तित्त्वात आल्यामुळे लोकपालाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवड मंडळावर पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश किंवा त्यांनी शिफारस केलेले सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीश आणि या चार जणांनी सुचविलेली पाचवी व्यक्ती यांचा समावेश आहे. निवड मंडळावर पाचव्या व्यक्तीच्या नावाची शिफारस उर्वरित चार जणांनी एकमताने केल्यानंतर राष्ट्रपती त्याची नियुक्ती करतील, असे या कायद्यात स्पष्ट केले आहे.