भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी शुक्रवारी तरूण वकिलांना सल्ला देताना ‘प्रोफेशनल स्पेशलायजेशन’ करण्यावर विशेष भर दिला. यावेळी त्यांनी चक्क टी२० क्रेकेटचा दाखला दिल्याचे पाहायला मिळाले. जसे क्रिकेटर्सकडून टी२० सामन्यामध्ये सर्वच भूमिका चोख बजावण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, तसेच वकील प्रत्येक आघाडीवर चांगली कामगिरी करू शकत नाही, असे निरीक्षण सूर्यकांत यांनी नोंदवले.

२८ फेब्रुवारी रोजी गांधीनगर येथील गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या (GNLU) १६ व्या पदवीदान समारंभात भाषणात सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी त्यांनी क्रिकेटचे दाखला देत सांगितले की, यशस्वी संघ हे भूमिकांबद्दलची स्पष्टता आणि वैयक्तिक क्षमतांवर उभारले जातात.

टी२० क्रिकेटचा दाखला देत असे निरिक्षण नोंदवले की, कोणालाही सूर्यकुमार यादवकडून ‘डेथ ओव्हर्स’मध्ये गोलंदाजी करण्याची किंवा जसप्रित बुमराने धावांचा पाठलाग करताना अँकरिंग कराण्याची अपेक्षा करत नाही. त्याचप्रमाणे वकिलांनी देखील त्यांच्या क्षमता काय आहेत हे ओळखले पाहिजे आणि त्याच कौशल्यांच्या भोवती स्वतःची व्यावसायीक ओळख तयार केली पाहिजे असे सरन्यायाधीश म्हणाले.

लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश म्हणाले की, “माझ्या प्रिय पदवीधरांनो, या व्यवसायात तुमचे नेमके स्थान काय आहे, हा प्रश्न सुरुवातीच्या काळातच स्वत:ला विचारणे महत्त्वाचे आहे. कारण हा व्यवसाय सर्वच गोष्टी एकाच वेळी करणार्‍याला क्वचितच यश देते. तुमच्यापैकी काहीजणांना क्रिकेटमध्ये रस असेल आणि न्यायालयीन सुनावणीच्या मध्ये जर तुम्ही टी-२० विश्वचषक पाहिला असेल, तर त्यामध्ये एक संबंधित गोष्ट लक्षात आली असेल. ज्या संघांना यश मिळते ते संघ हे प्रत्येक खेळाडूने प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट असलेच पाहिजे या समजुतीवर उभारलेल्या नसतात. कोणीही सूर्यकुमार यादवकडे ‘डेथ ओव्हर्स’मध्ये गोलंदाजी करण्याची, किंवा बुमराहकडे धावांचा पाठलाग करण्याची अपेक्षा करत नाही. ते सर्वोत्तम जी गोष्ट करतात नेमकी त्याकरिताच त्यांच्यावर विश्वास टाकला जातो आणि याच स्पष्टतेच्या आधारावर संघाची उभारणी केली जाते. हेच तत्त्व तुमच्या व्यवसायालाही लागू पडते, असे मला वाटते.”

सरन्यायाधीश म्हणाले की यशस्वी वकिलांनी सर्वच गोष्टीत एकसमान प्रयत्न करून हे यश मिळवलेले नाही. “ते इथपर्यंत पोहचले, ते बऱ्याचदा शांतपणे आणि वेळेबरोबर, स्वत:च्या विचारांची नेमकी नैसर्गिक दिशा कुठे जाते, हे ओळखून,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “हा असा प्रश्न नाही ज्याचे उत्तर पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षातच मिळेल. परंतु, करिअरच्या सुरुवातीलाच स्वत:ला हा प्रश्न विचारणे आणि त्यावर वारंवार विचार करणे योग्य ठरेल. कारण जे वकील त्यातल्या त्यात सर्वात सहज दिसून येतात, ते जवळपास कोणत्याही अपवादाशिवाय ते असतात ज्यांनी एके काळी आपले काम सोडून वकिली करण्यास सुरुवात केलेली असते.”

सीजेआय म्हणाले की, लॉ प्रॅक्टिसच्या सुरूवातीच्या काळात नेहमी अकॅडेमिक लर्निंग आणि प्रोफेशनल रियालिटी यांच्यातील अंतर कमी होत जाते. ते म्हणाले की पुस्तके फक्त समज देतात, परंतु प्रत्यक्ष व्यावसायिक अभ्यासातून शिस्त, जबाबदारी आणि व्यावहारिक अडथळ्यांमध्ये राहून काम करण्याच्या क्षमतेची आवश्यकता असते. वकिलांचे बहुतांश काम हे दुर्लक्षित आणि उपेक्षित राहते, असेही त्यांनी नमूद केले.