CJI Surya Kant Cockroach Remark Clarification: भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केलेली तोंडी टिप्पणी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. एका वकिलाच्या ज्येष्ठतेच्या दाव्याच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी काही टिप्पण्या केल्या होत्या. यात प्रामुख्याने ‘काही बेरोजगार तरुण हे झुरळासारखे’ असल्याचे विधान समाविष्ट होते. ज्यामुळे अनेकांनी या टिप्पणीवर टीका केली. त्यानंतर शनिवारी सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या निरीक्षणाचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला, असे ते म्हणाले.
शनिवारी स्पष्टीकरण देत असताना सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले, “एका क्षुल्लक खटल्याच्या सुनावणीदरम्यान माझ्या तोंडी निरीक्षणांना प्रसारमाध्यमांच्या एका गटाने चुकीच्या पद्धतीने दाखवले. हे पाहून मला दुःख झाले. जे लोक बोगस आणि खोट्या पदव्यांच्या आधारे वकिलीसारख्या क्षेत्रात शिरले आहेत, अशा लोकांवर मी टीका केली होती. अशा पद्धतीचे लोक प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही शिरले आहेत, त्यामुळे ते परजीवींसारखे आहेत, असे माझे विधान होते. पण आपल्या देशातील तरुणांवर टीका केली, असे सुचवणे पूर्णपणे निराधार आहे.”
सरन्यायाधीश सूर्य कांत पुढे म्हणाले, “देशातील तरुणांचा मला अभिमान आहे. मी तरुणांना विकसित भारताचा आधारस्तंभ मानतो. मला वर्तमान आणि भविष्यातील मनुष्यबळाचा अभिमान आहेच, त्याशिवाय प्रत्येक भारतीय तरुण मला प्रेरित करतो. भारतीय तरुणांच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे आणि मीही त्यांना विकसित भारताचे आधारस्तंभ मानतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.”
प्रकरण काय होते?
आपल्याला वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने दाखल केली होती. अशी याचिका वारंवार करत असल्याबद्दल सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

‘ज्येष्ठत्व हे मागितले जात नाही तर, ते अर्जित करावे लागते,’ असे न्या. बागची म्हणाले. तसेच वरिष्ठ वकील पद हा काही प्रतिष्ठेचा अलंकार आहे का, अशी विचारणाही त्यांनी या वकिलाला केली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तर संबंधित वकिलाला ‘दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्हाला वरिष्ठ वकील पद बहाल केले तरी आम्ही ते आदेश रद्द करू,’ असा इशारा दिला.
याचिकाकर्त्याने समाजमाध्यमावर व्यक्त केलेल्या मतांबद्दल सरन्यायाधीशांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “व्यवस्थेवर हल्ला करणारे परजीवी समाजात आधीच भरलेले आहेत. आता तुम्हीही त्यात सामील होणार का?… काही तरुण झुरळासारखे असतात, ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नसते. त्यातले काही माध्यमांत जातात, काही समाजमाध्यमांत जातात, काही माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा अन्य कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवर हल्ले करत सुटतात”, अशी टिप्पणी त्यांनी केली.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यावर अनेकांची टीका
दरम्यान सरन्यायाधीश यांच्या टिप्पणीवर अनेकांनी टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर “होय, मी झुरळ आहे”, असे म्हणत व्यवस्थेला प्रश्न विचारत राहणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर झुरळांना राष्ट्रीय आणि पक्षीय धोरणांच्या अपयशामध्ये विनाकारण त्यांना खेचल्या बद्दल? त्यांनी जनहित याचिका दाखल केली, हे खरं आहे का? असा सवाल अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
याशिवाय वकील असीम सरोदे यांनीही टीका केली. ते म्हणाले, “नवीन पिढीची अक्कल काढून बेरोजगार तरुणांचा अपमान केलाच आणि पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते यांची तुलना झुरळांशी केल्याने झुरळांना नक्कीच आनंद झाला असेल. शेवटी एका वाक्यातील विचार मायलॉर्ड ने सिद्ध केला की, सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च शहाणपण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”
काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी तर सरन्यायाधीश यांच्यावर संताप व्यक्त केला. “तुमचा मुलगा झुरळ आहे का? ही कसली भाषा आहे? तुम्ही ज्या पदावर बसला आहात, त्या पदाची प्रतिष्ठा कमी करत आहात”, अशी टीका हुसेन दलवाई यांनी केली.
