वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी शुक्रवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केलेल्या झुरळ आणि परजीवी टिप्पणीबद्दल शनिवारी खुलासा केला. याबाबत माध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे आपल्याला वेदना झाल्याचे न्या. कांत यांनी म्हटले आहे. आपण केलेले वक्तव्य हे बेरोजगार तरुणांबद्दल केलेले नसून बनावट पदवीधारकांना उद्देशून होते, असे सरन्यायाधीशांनी वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्या. कांत यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून विशेषतः समाजमाध्यांतून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यानंतर त्यांनी शनिवारी आपली बाजू मांडणारे निवेदन प्रसिद्ध केले. “काल एका क्षुल्लक खटल्याच्या सुनावणीदरम्यान मी नोंदवलेल्या तोंडी निरीक्षणाचा विपर्यास करून काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांमध्ये आपण तरुणांवर टीका केल्याचे वाचून मला वेदना झाल्या,” असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. “मी विशेष करून बनावट पदव्यांच्या मदतीने विधिव्यवसायात प्रवेश केलेल्यांवर टीका केली होती. अशाच व्यक्तींनी माध्यमे, समाजमाध्यमे आणि इतर चांगल्या व्यवसायातही शिरकाव केला आहे आणि या अर्थाने ते परजीवी आहेत,” असे न्या. कांत यांनी आपल्या खुलाशात नमूद केले आहे. म्हटले आहे.
वादाची पार्श्वभूमी
वकील संजय दुबे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे महा प्रबंधक यांच्याविरोधात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश न्या. कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने दुबे यांची कानउघाडणी केली.
त्यावेळी सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत तोंडी निरीक्षण नोंदवताना म्हणाले होते की, “काही तरुण झुरळांसारखे आहेत, त्यांना कोणतीही नोकरी मिळत नाही आणि व्यवसायात त्यांना कोणतेही स्थान नाही. त्यांच्यापैकी काही माध्यमांमध्ये जातात, काही समाजमाध्यमांवर आहेत आणि काही माहिती अधिकार कार्यकर्ते होतात, काही इतर प्रकारचे कार्यकर्ते होतात आणि ते सर्वांवर हल्ला करत सुटतात.” दुबे यांनी आपल्याला ज्येष्ठ वकील हे पद मिळावे अशी मागणी या याचिकेत केली आहे. त्यावर, “स्वतःला ज्येष्ठ वकील म्हणवून घेणे हे प्रतिष्ठेचे प्रतीक आहे की न्यायव्यवस्थेमध्ये सहभागी होण्याचे साधन आहे,” असा प्रश्न न्या. बागची यांनी विचारला होता.
मी या देशाच्या तरुणांवर टीका केली असे सूचित करणे हे पूर्णपणे निराधार आहे. मला केवळ आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांचा अभिमान नाही तर देशातील प्रत्येक तरुणाकडून मला प्रेरणा मिळते. भारतीय तरुणांना माझ्याबद्दल खूप आदर वाटतो असे म्हणण्यात कोणतीही अतिशोयक्ती नाही आणि मीही त्यांच्याकडे विकसित भारताचे स्तंभ म्हणून पाहतो.- न्या. सूर्य कांत, सरन्यायाधीश
