CJI Surya Kant London Speech : बर्कबेकच्या युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या व्याख्यानादरम्यान उपस्थितांनी भारतातील मतभेद (असंतोष) आणि त्यांच्या अलीकडील झुरळसंबंधीच्या वक्तव्यावरून त्यांना प्रश्न विचारल्यामुळे वाद निर्माण झाला. परिणामी प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान गोंधळ उडाला. ही घटना ४ जून रोजी सरन्यायाधीशांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आंतरराष्ट्रीय कायदा” या विषयावर भाषण दिल्यानंतर घडली. या घटनेनंतर भारताने तत्काळ प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

संवादात्मक सत्रादरम्यान, एका उपस्थिताने सरन्यायाधीश कांत यांना भारताच्या लोकशाहीच्या स्थितीबद्दल आणि त्यांच्या मते वाढत्या असंतोषाच्या विरोधी वातावरणाबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन फिरत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, उपस्थित व्यक्ती असे म्हणतोय, “आम्ही आता देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कायदेशीर निरीक्षकांकडून ऐकत आहोत की भारतातील वाढत्या मतभेदांच्या विरोधाबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आणि असे दिसते की हा विरोध काही प्रमाणात सरन्यायाधीशांच्या भाषणातही दिसून येतो आणि हे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे.”

दुसऱ्या एका उपस्थिताने सरन्यायाधीशांना त्यांनी १५ मे रोजी न्यायालयात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, ज्यावरून नंतर भारतात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. हा संवाद सूत्रधाराने (मॉडरेटर) मधेच थांबवला आणि त्यांनी हे प्रश्न घेण्यास नकार दिला. “पूर्ण आदरासह, मी हा प्रश्न घेऊ शकणार नाही कारण आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित आहे,” असे सूत्रधार म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान गदारोळ

कार्यक्रमाच्या ठिकाणच्या व्हिडिओंमध्ये तणावाचे वातावरण दिसत होते, कारण चर्चा सुरू असताना काही उपस्थित लोक उभे राहिले आणि हातवारे करू लागले.

उच्चायुक्तालयाकडून घटनेचा निषेध

युनायटेड किंगडमधील (UK) भारताच्या उच्चायुक्तालयाने या गोंधळावर टीका केली असून यामध्ये सामील असलेल्यांच्या वर्तनाचा ‘अयोग्य’ असा उल्लेख केला आहे. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात उच्चायुक्तालयाने म्हटले आहे की, ४ जूनच्या कार्यक्रमात व्याख्यानानंतर उत्साही चर्चा झाली, परंतु त्यानंतर एका उपस्थिताने कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.” असे असभ्य वर्तन अस्वीकारार्ह आहे आणि सार्वजनिक संवादाला शोभणारे नाही. मतांचे मतभेद हे लोकशाही समाजाचा एक नैसर्गिक भाग आहेत. परंतु, ते नागरी आणि आदरयुक्त पद्धतीने व्यक्त केले गेले पाहिजेत”, असे या निवेदनात म्हटले आहे.