CJI Surya Kant: भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ केली. “काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात”, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले. “असे तरुण पुढे जाऊन माध्यमं, समाज माध्यमं आणि माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात”, असे निरीक्षण सरन्यायाधीशांनी शुक्रवारी नोंदवले, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

वकिलाच्या याचिकेवर सुनावणी

पीटीआयच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. एका वकिलाने स्वतःला वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. समाजात आधीच अनेक परजीवी वावरत असून ते सतत व्यवस्थेला टार्गेट करत असल्याचे भाष्य यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केले.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल

“समाजात अनेक परजीवी वावरत आहेत, ते सातत्याने व्यवस्थेला लक्ष्य करत असतात. तुम्हाला देखील त्यांची हात मिळवायचा आहे का?”, असा थेट सवाल खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला विचारला. तसेच, “कदाचित सगळचे जगच वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल. पण, किमान तुम्ही तरी या पदासाठी पात्र नाहीत”, असा शब्दात खंडपीठाने वकिलाला खडसावले. “दिल्ली उच्च न्यायालयाने जरी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली असती तरी तुमचे व्यावसायिक वर्तन पाहता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला असता”, असेही न्यायालयाने पुढे स्पष्ट केले.

समाज माध्यमावरील भाषेचा दाखला

सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याने फेसबुकवर वापरलेल्या भाषेचा संदर्भ देत संताप व्यक्त केला. सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वर्तनावर, यापूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट याचा दाखल देत वकिलाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचिकाकर्त्यांनी फेसबुकवर वापरलेली भाषा त्याची वरिष्ठ म्हणून नियुक्ती करण्यासाठी योग्य नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. “त्यांच्या कायद्याच्या पदवीबाबत मला शंका आहे… ते फेसबुक, यूट्यूबवर ज्या गोष्टी पोस्ट करतात त्याकडे आमचे लक्ष नाही असे त्यांना वाटते. व्यावसायिक शिस्त काय असते हे मी तुम्हाला दाखवतो”, असेही सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले.