CJI Surya Kant cockroach comment controversy: गेल्या दोन दिवसांपासून सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका विधानावरून देशाच्या न्यायालयीन व सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. सरन्यायाधीशांनी एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी देशातील तरुणांचा उल्लेख करताना हे विधान केलं. या विधानावर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यावर स्पष्टीकरण देताना आपल्या विधानाचा गैरअर्थ काढून दाखवण्यात आल्याचा खुलासादेखील केला. पण नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? याबाबत तर्क-वितर्क चालूच असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्या प्रसंगाचा एक व्हिडीओ एक्सवर रीशेअर केला असून त्यावर थेट सरन्यायाधीशांनीच सुनावण्यांमधून माघार घेण्याची मागणी केली आहे.
सरन्यायाधीशांच्या विधानावर नेमका वाद का?
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीवेळी देशातील कायद्याच्या बेरोजगार तरुणांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांवर परखड भूमिका मांडली. हे तरुण वकिलीचा सराव न करता वेगाने सोशल मीडिया, माहिती अधिकार या माध्यमातून टीकाकार होऊ लागले आहेत, अशा आशयाची टीका त्यांनी केली. मात्र, त्यासंदर्भात त्यांनी केलेलं विधान सार्वत्रिक टीकेच्या केंद्रस्थानी आलं.
“आधीच सामाजात खूप सारे असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करत असतात. तुम्हाला त्यांच्याच रांगेत जाऊन बसायचंय?” असा सवाल त्यांनी समोरच्या उपस्थितांना केला. लाईव्ह लॉ व एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार ते पुढे म्हणाले, “झुरळांसारखे असे काही तरुण आहेत जे बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे काहीही काम नाही आणि प्रोफेशनमध्ये त्यांना काहीही स्थान नाही. त्यांच्यातले काही प्रसारमाध्यमं होतात, काही सोशल मीडिया होतात तर काही आरटीआय कार्यकर्तेही होतात. काहीजण इतर प्रकारचे कार्यकर्ते होतात आणि सगळ्यांवर हल्ले करायला लागतात. त्यानंतर तुम्ही लोक मानहानीचे खटले दाखल करता”, असं सरन्यायाधीश सुनावणीवेळी म्हणाले.
बनावट वकिलीच्या पदवीबाबत चिंता
यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत व न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांनी सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या दिल्लीतील अनेक वकिलांच्या बनावट पदवीबाबत चिंता व्यक्त केली. “आम्ही योग्य प्रकरणाची वाट पाहात आहोत ज्यात आम्ही अशा बनावट पदवींची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊ शकू. या पदवींच्या सत्यतेबाबत मला गंभीर शंका आहेत. ज्या प्रकारचा मजकूर ही मंडळी समाजमाध्यमांवर टाकत आहेत त्यांना काय वाटतं? आम्हाला ते दिसत नाही का?” असा संतापदेखील सरन्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केला.
अंजली दमानियांनी शेअर केला Video, केली ‘ही’ मागणी!
दरम्यान, सरन्यायाधीशांनी वापरलेल्या झुरळाच्या उपमेवर समाजमाध्यमांपासून सामाजिक जीवनातील मंडळींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात अंजली दमानियांनी सोशल पोस्टमध्ये सरन्यायाधीशांनीच तरुणांशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीतून स्वत:ला दूर ठेवावं, अशी मागणी केली आहे. न्यायालयातील त्या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करत “हे ऐकल्यानंतर माझी माननीय सरन्यायाधीशांकडे मागणी आहे की न्यायाच्या भल्यासाठी त्यांनी इथून पुढे जनहित याचिका, तरुणांशी संबंधित खटले किंवा समाजमाध्यमांशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीपासून स्वत:ला दूर ठेवावं”, अशी पोस्ट दमानिया यांनी केली आहे.
सरन्यायाधीशांनी विधानाबाबत काय दिलं स्पष्टीकरण?
दरम्यान, आपल्या विधानावर व्यापक प्रमाणावर टीका झाल्यानंतर खुद्द सरन्यायाधीश सूर्य कांत यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “काल एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान मी व्यक्त केलेली टिप्पणी काही माध्यमांनी ज्या प्रकारे चुकीचा अर्थ काढून दाखवली, ते पाहून मला वेदना होत आहेत. न्यायव्यवस्थेमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेऊन शिरकाव केलेल्या व्यक्तींबाबत मी टीकात्मक टिप्पणी केली होती. हीच माणसं मग प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जातात. त्यामुळेच ते परजीवीप्रमाणे आहेत. मी देशाच्या संपूर्ण तरुण पिढीवर टीका केली असं म्हणणं पूर्णपणे निराधार आहे”, असं सरन्यायाधीशांनी आपल्या स्पष्टीकरणात नमूद केलं आहे.
“मला देशाच्या विद्यमान व भावी तरुणाईचा अभिमान आहे. देशाचा प्रत्येक तरुण मला प्रेरणा देत असतो. भारतीय तरुणांना माझ्याबद्दल खूप आदर असून मीदेखील त्यांच्याकडे विकसित भारताचे आधारस्तंभ म्हणूनच पाहातो”, असंही सरन्यायाधीशांनी नमूद केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
